Solar Eclipse During Live Cricket Match In The Hundred: मैदानावर क्रिकेटचा सामना सुरु असेल आणि त्याचवेळी सूर्यग्रहणाचा अद्भुत नजारा पाहण्याची संधी मिळाली, तर याहून उत्तम आणखी काय असेल. असंच काहीसं चित्र इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालं. हे सूर्यग्रहण भारतातून पाहता आलं नाही. पण भारतीय वेळेनुसार बुधवारी संध्याकाळच्या वेळी जगभरातील अनेक देशांमधून हे सूर्यग्रहण पाहिलं गेलं. दरम्यान क्रिकेट सामन सुरु असताना चाहत्यांसह क्रिकेटपटूही सूर्यग्रहणाचा अद्भुत नजारा पाहताना दिसून आले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
द हंड्रेड लीग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात एमआय लंडन आणि बर्मिंघम फिनिक्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावातील ६० चेंडूंचा खेळ पूर्ण होताच, अचानक काळोख पसरला. दिवसाढवळ्या अंधार पडल्याने सर्वांच्या नजरा वर आकाशाकडे गेल्या. काही वेळापूर्वी प्रकाशमय असलेला सूर्य अचानक चंद्रासारखा भासू लागला. सूर्याला आपण असं उघड्या डोळ्याने व्यवस्थित पाहू शकत नाही. त्यामुळे चाहत्यांनी काळ्या रंगाचा चष्मा लावून हे सूर्यग्रहण पाहिलं. मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांसह क्रिकेट खेळत असलेले खेळाडू देखील हा अद्भुत नजारा पाहताना दिसून आले. त्यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात एमआय लंडनचा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना विल जॅक्स अवघ्या ११ धावा करुन माघारी परतला. तर जेम्स विन्स २२ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरने ३६ धावांचे योगदान दिले. तर जेसन रॉयने २६ धावा केल्या. सिकंदर रझाने १७ धावांचे योगदान दिले. तर शेवटी ओली सायकेसने नाबाद २३ आणि टॉम करनने नाबाद १७ धावा करुन १०० चेंडूंअखेर संघाची धावसंख्या ६ गडी बाद १५७ धावांवर पोहोचवली.
बर्मिंघम फिनिक्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५६ धावांचा पाठलाग करायचा होता. सलामीला आलेला जो क्लार्क १, मिचेल ओवन १८ धावांवर माघारी परतला. तर जो वेदर्लीने ४२ धावांची दमदार खेळी केली. तर सियान डिकसनने २३ धावांची खेळी केली. कर्णधार डोनोवन फरेराने १४ धावा केल्या. शेवटी थॉम्पसनने २३ आणि रेहान अहमदने २३ धावांची खेळी केली. पण बर्मिंघम फिनिक्सचा संघ विजयापासून २ धावा दूर राहिला.
