वृत्तसंस्था, बर्मिगहॅम : मोक्याच्या क्षणी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे सलामीचा सामना गमावणाऱ्या भारतीय महिला संघाचे रविवारी पाकिस्तानविरुद्ध राष्ट्रकुल स्पर्धेतील ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात विजयी पुनरागमनाचे लक्ष्य आहे.

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याना राष्ट्रकुल स्पर्धेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले. भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून, तर पाकिस्तानने बार्बाडोसकडून हार पत्करली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर (५२) आणि शफाली वर्मा (४८) यांनी उत्तम योगदान दिले. गोलंदाजीत रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियाच्या अव्वल चार फलंदाजांना माघारी पाठवत चमक दाखवली. मात्र त्यांना इतर खेळाडूंची साथ मिळणे गरजेचे आहे.

भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते. तसेच उभय संघांमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या ११ पैकी नऊ ट्वेन्टी-२० सामन्यांत विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जात आहे.

  • वेळ : दु. ३.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३