scorecardresearch

हार्दिक अहमदाबादचा, तर राहुल लखनऊचा कर्णधार

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा अहमदाबाद, तर अनुभवी सलामीवीर के. एल. राहुल लखनऊ संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

‘आयपीएल’च्या आगामी हंगामासाठी नव्या संघांतील तीन खेळाडू सुनिश्चित

पीटीआय, नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा अहमदाबाद, तर अनुभवी सलामीवीर के. एल. राहुल लखनऊ संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यंदा एप्रिल-मे महिन्यात भारतात ‘आयपीएल’ खेळवण्यात येईल, असे अपेक्षित असून अहमदाबाद आणि लखनऊ यांनी आपापल्या संघातील तीन खेळाडूंची निवडही केली आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावप्रक्रियेपूर्वी या दोन्ही संघांना उपलब्ध खेळाडूंपैकी तिघांचा समावेश करण्याची मुभा देण्यात आली होती.

अहमदाबादने हार्दिकव्यतिरिक्त युवा सलामीवीर शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा अव्वल फिरकीपटू रशीद खान यांना संघात सहभागी केले आहे. अहमदाबाद डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला संघात घेण्यासाठी उत्सुक होते. परंतु किशनने लिलावप्रक्रियेत उतरण्याची इच्छा व्यक्त केल्याने अहमदाबादच्या संघमालकांनी गिलला प्राधान्य दिले. गेल्या हंगामात हार्दिक मुंबई इंडियन्स, गिल कोलकाता नाइट रायडर्स तर रशीद सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता. आशीष नेहरा या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे लखनऊने राहुलसह युवा फिरकीपटू रवी बिश्नोई आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोयनिस यांची निवड केली. राहुल आणि बिश्नोई या दोघांनी गेल्या हंगामात पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले. तर स्टोयनिस दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. राहुलला १५ कोटी, स्टोयनिसला ११, तर बिश्नोईला ४ कोटी रुपयांत लखनऊने करारबद्ध केल्याचे समजते. अँडी फ्लॉवर या संघाचे प्रशिक्षकपद बजावणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket ipl hardik captain ahmedabad rahul captain lucknow ysh

ताज्या बातम्या