scorecardresearch

ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन; वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

Cricket legend Shane Warne has died suspected heart attack

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तेथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.

जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.

शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जात होता. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती.

वॉर्नच्या कसोटीत ७०८ विकेट

ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.

शेन वॉर्नने आपल्या खेळाने जगाला जितके प्रभावित केले आहे तितकेच त्याच्या वादांमुळे क्रिकेट जगतात निराशा झाली आहे. १९९८ मध्ये बुकीला माहिती दिल्याबद्दल वॉर्नला दंड ठोठावण्यात आला होता आणि २००३ च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.

१९९६ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध वॉर्नने जोरदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket legend shane warne has died suspected heart attack abn