5 International Matches On Same Day: क्रिकेट चाहत्यांना आणखी काय हवं? आज (९ ऑक्टोबर) एकाच दिवशी ५ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. १० बलाढ्य संघ वेगवेगळ्या मैदानावर एकमेकांचा सामना करताना दिसून येणार आहेत. भारतीय संघ दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करताना दिसून येणार आहे. तर भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाचा सामना करणार आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा आव्हान देताना दिसेल. दरम्यान हे सामने लाईव्ह कुठे आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ
ऑस्ट्रेलिया अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये अनधिकृत वनडे सामन्याचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तुम्ही हा सामना हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश
अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना दुबईतील शेख जायद स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकता.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. डोकी संघामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज डर्बनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. हा सामना देखील तुम्ही फॅनकोडवर लाईव्ह पाहू शकता.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
तसेच श्रीलंकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही VETO या ॲपवर लाईव्ह पाहू शकता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रांचीत खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
