भारतीय संघाचे आव्हान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. पण धोनीने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दितीबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या दरम्यान माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. निवड समितीने धोनीशी त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे, असे मोरे यांनी सुचवले आहे.

“महेंद्रसिंग धोनी हा अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यासारख्या खेळाडूंबाबत निर्णय घेताना निवड समितीने सगळ्या शक्यतांचा विचार करणे गरजेचे आहे. निवड समिती सदस्यांनी धोनीशी त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली पाहिजे. तसेच निवड समितीला धोनीबाबत काय वाटते हे देखील त्यांनी धोनीला सांगितले पाहिजे. असे केल्यास खेळाडू आणि निवडकर्ते यांच्यात कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही आणि याचा भारतीय संघाला फायदाच होईल”, असे किरण मोरे यांनी सांगितले.

किरण मोरे

 

धोनीच्या संथ खेळीमुळे तो विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये टीकेचा धनी ठरला होता. पण उपांत्य सामन्यात त्याने केलेल्या खेळीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते. याशिवाय भारतीय संघाच्या भविष्याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

“विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवलेल्या भारतीय संघाने कशा पद्धतीची कामगिरी केली आहे हे साऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पुढील दोन वर्षात कसा अधिक परिपक्व होईल? त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. सध्याच्या खेळाडूंसाठी आपल्याकडे बॅक-अप खेळाडू तयार असायला हवा आणि नव्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी देण्यात यायला हवी, असेही मोरे यांनी नमूद केले.