क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, भारत २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये हा सामना होणार आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल आणि तिसरी आणि केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर उभय संघांमधील तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारी रोजी पार्ल येथे, दुसरा सामना पार्ल येथे आणि तिसरा आणि अंतिम केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.

हेही वाचा – भारतीय क्रिकेटमध्ये उलथापालथ..! विराटचं वनडेचं कप्तानपद धोक्यात; रोहित शर्माला मिळणार ‘नवी’ जबाबदारी!

भारताचा हा दौरा यापूर्वी १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला चार सामन्यांची टी-२० मालिकाही खेळायची होती. पण करोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराच्या प्रसारादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार होता, जो पुढे ढकलण्यात आला आहे आणि नवीन तारखा नंतर ठरवल्या जातील.

हा दौरा कडक करोना प्रोटोकॉलसह असेल आणि खेळाडूंची सुरक्षा आणि जैव-सुरक्षित वातावरण लक्षात घेऊन ठिकाणे निवडली जातील. भारतीय संघ आधी ९ डिसेंबरला रवाना होणार होता. ओमिक्रॉनचा उगम दक्षिण आफ्रिकेतून झाला आहे आणि त्याची प्रकरणे तेथे सतत वाढत आहेत. यामुळे नेदरलँड संघाने आपला दौरा मध्येच सोडून दिला. काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्याने सीएसएला घरचे सामनेही पुढे ढकलावे लागले. भारत ‘अ’ संघ मात्र, वरिष्ठ संघाचा दौरा रद्द न करण्याची आशा देत दक्षिण आफ्रिकेतच राहिला. भारताने दक्षिण आफ्रिकेची उड्डाणेही बंद केलेली नाहीत, तरीही ती ‘जोखीम’ श्रेणीत ठेवली आहे. भारतीय संघाचा दौरा रद्द झाल्यास सीएसएचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. सीएसएचे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी या कठीण काळात एकत्र उभे राहिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी – २६-३० डिसेंबर, सेंच्युरियन
  • दुसरी कसोटी – ०३-०७ जानेवारी, जोहान्सबर्ग
  • तिसरी कसोटी – ११-१५ जानेवारी, केपटाऊन

एकदिवसीय मालिका

  • पहिली वनडे – १९ जानेवारी, पार्ल
  • दुसरी वनडे – २१ जानेवारी, पार्ल
  • तिसरी वनडे – २३ जानेवारी, केपटाऊन
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket south africa announces revised schedule of india tour of south africa adn
First published on: 07-12-2021 at 08:34 IST