वर्ल्डकप वर्षभरावर आलेला असताना दक्षिण आफ्रिका बोर्डाने अनुभवी फिनिशर डेव्हिड मिलरला वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळलं. जरी मी जगभरात टी२० लीग खेळत असलो तरी आफ्रिकेसाठी खेळणं हे माझं सर्वोच्च प्राधान्य असेल. तो अतिशय अभिमानाचा, आनंदाचा आणि समाधानचा क्षण असतो असं मिलरने सांगितलं. नुसतं बोलून थांबला नाही तर जोहान्सबर्ग वनडेत मिलरने खणखणीत शतकी खेळी साकारत निवडसमिती आणि बोर्डाला प्रत्युत्तर दिलं.

जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर मिलरने ९३ चेंडूत १२ चौकार आणि ९ षटकारांसह १४२ धावांची तडाखेबंद खेळी केली. मिलरने कर्णधार तेंबा बावूमाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १३२ चेंडूत १५६ धावांची खेळी केली. तेंबाच्या शतकानंतर मिलरने सूत्रं हाती घेत जोरदार फटकेबाजी केली. मिलरचं वनडे कारकिर्दीतलं हे आठवं शतक आहे.

आफ्रिकेने एकदाही वनडे वर्ल्डकप जिंकलेला नाही. २०२७ वर्ल्डकप आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया इथे होणार आहे. आफ्रिकेचा संघ सहयजमान आहे. १५ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला मिलर दक्षिण आफ्रिका संघासाठी निर्णायक ठरू शकतो. घरच्या मैदानावर आफ्रिकेला जिंकून देण्यासाठी मिलर आतूर आहे. मात्र तरीही बोर्डाने अनाकलनीय निर्णय घेत मिलरला संघाबाहेर केलं. फिनिशरच्या जागेसाठी अनेक युवा खेळाडू शर्यतीत असल्याने मिलरला डच्चू देण्यात आला. मात्र या निर्णयानंतरही मिलरने आफ्रिकेकडून खेळण्यासाठी कटिबद्ध असल्याचं दाखवून दिलं आहे. ३७वर्षीय मिलरसाठी पुढच्या वर्षी होणारा वर्ल्डकप शेवटचा असू शकतो.

मिलर २०१५, २०१९ आणि २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाचा अविभाज्य भाग होता. वर्ल्डकप स्पर्धेत २४ लढतीत त्याच्या नावावर ८१६ धावा आहेत. यामध्ये २ शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. घरच्या मैदानावर मिलरची कामगिरी आणखीनच बहरते.

वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळल्यानंतरही मिलरची निवड होऊ शकते पण तो प्रथम प्राधान्य नसेल. मिलरने १७९ वनडेत आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करताना ४६२० धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. मिलर याव्यतिरिक्त युरोपियन टी२० लीग, आयपीएल, द हंड्रेड, sat20, कॅरेबियन प्रीमिअर लीग, मेजर लीग क्रिकेट, बांगलादेश प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग, लंका प्रीमिअर लीग, व्हायटॅलिटी ब्लास्ट अशा स्पर्धांमध्ये खेळतो.