World Cup: विराटच्या वाढदिवशीच भारताला नामिबियाकडून सुरेख भेट; उपांत्य फेरीचा प्रवास झाला सुखकर

काल भारताने स्कॉटलंडला पराभूत केलं तर न्यझीलंडने नामिबियाला पराभूत केलं, मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा फायदा झालाय.

new zealand vs namibia t20 world cup
ही खरं तर भारतासाठी आनंदाची बातमी

भारतीय संघासाठी टी-२० विश्वचषक स्पर्धेमधून त्यांच्या मागील दोन विजयांशिवाय आणखीन एक आनंदाची बातमी समोर आलीय. न्यूझीलंड विरुद्ध नामिबियचा सामन्यामध्ये न्यूझीलंडने नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केलं. मात्र न्यूझीलंडला मोठा विजय मिळवता आला नसल्याने त्यांचं नेट रनरेट हे अफगाणिस्तानहूनही खाली गेलं आहे. त्यामुळेच जर अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमधील अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत गेलं तर न्यूझीलंड आपोआप उपांत्यफेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडेल आणि भारताला केवळ अफगाणिस्तानच्या नेट रनरेटची चिंता करावी लागेल. अफगाणिस्ताने न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला तर ते उपांत्यफेरीच्या शर्यतीत कायम राहतील.

न्यूझीलंडला नामिबियाविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेट सुधारण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना ९४ धावांवर रोखायचं होतं. मात्र नामिबियाच्या संघाने १११ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत ४ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. संघाने ८७ धावांवर चार गडी गमावले होते. नंतर ग्लेन फिलिप्सने नाबाद ३९ तर जिमी नीशमने नाबाद ३५ धावा करत स्कोअरकार्ड १६० च्या वर नेलं.

या धावांचा पाठलाग करताना नामिबियाला अपयश आलं पण त्यांनी १०० धावांचा टप्पा पार केल्याने सामना जिंकूनही न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे नामिबियाच्या संघाने चांगली फलंदाजी करुन एकाप्रकारे काल भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडचा नेट रनरेट वाढणार नाही याची दक्षता देत एक सुरेख भेटच दिली असं म्हणावं लागेल.

दुसरीकडे भारताने स्कॉटलंडविरुद्धचा सामना अगदी धडाकेबाज पद्धतीने जिंकत ग्रुप टूमध्ये सर्वोत्तम नेट रनरेटपर्यंत मजल मारलीय. त्यामुळे आता उद्याचा अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सामना झाल्यानंतर या ग्रुपचं चित्र अधिक स्पष्ट होईल. म्हणजे अफगाणिस्ताने सामना जिंकला तर नामिबियाविरुद्ध किती मोठा विजय मिळवल्यास भारत उपांत्य फेरीत नेट रनरेटच्या जोरावर जाऊ शकतो याचं गणित निश्चित होईल. मात्र न्यूझीलंडने विजय मिळवला तर त्यांचं स्थान उपांत्यफेरीत निश्चित होईल. भारताचा पुढील सामना आठ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरोधात होणार आहे.

पहिल्या ग्रुपमध्ये इंग्लंडने उपांत्यफेरीत धडक मारली असून तिथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपांत्य फेरीच्या जागेसाठी चुरस सुरु आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि गतविजेता वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricket t20 world cup 2021 new zealand beat namibai but their run rate is lower than afghanistan team india scsg

Next Story
सर्वसामान्य चाहत्यांसाठी फक्त सहा हजार तिकिटे
ताज्या बातम्या