चंद्रकांत पंडित

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताला अवघ्या १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी फार निराश झाले आहेत. स्वाभाविकपणे हा सामना कसा गमावला, याचे निष्कर्ष लावले जात आहेत. परंतु विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यातसुद्धा न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे आपली फलंदाजी ढेपाळली होती, त्यातून धडा घेत जबाबदारीने फलंदाजी केली असती तर भारताने अंतिम फेरी गाठली असती.

कासवाच्या चालीने उपांत्य फेरीत आलेला न्यूझीलंडचा संघ भारताच्या क्षमतेपेक्षा कमकुवत असला तरी त्या संघाच्या क्षमतेची कल्पना भारताला होतीच. भारताची विश्वचषकातील यशस्वी घोडदौड पाहता न्यूझीलंड संघावर आपण सहजच मात करून अंतिम फेरी गाठू, अशी सर्वाना खात्री होती. खेळाच्या एकूण अनुभवावरून मला असे वाटते की, यशस्वी घोडदौडीसह चालणारा संघ महत्त्वाच्या सामन्यात कोठे तरी डगमगतो आणि कासवाच्या चालीने जाणारा संघ हा बलाढय़ संघावर मात करत चमत्कार घडवतो. आपल्याबाबत तेच घडले.

जो संघ नाणेफेक जिंकेल तोच संघ हा सामना जिंकू शकेल, असे म्हटले जात होते; परंतु जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांच्या गोलंदाजीने न्यूझीलंडला थोपवून ठेवण्यात भारताला यश मिळाले. आपण न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांना झटपट बाद केले; परंतु त्यांचे दोन प्रमुख फलंदाज म्हणजे केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांना लवकर बाद करणे आपल्याला जमले नाही. या दोघांवर फलंदाजी करताना दडपण आल्यामुळे त्यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. न्यूझीलंडची वेगवान गोलंदाजांची फळी उत्तम आहे आणि यासाठी सन्मानजनक धावसंख्या भारतासमोर उभी करणे गरजेचे होते. त्यामुळेच संथ गतीने खेळण्याचा पवित्रा न्यूझीलंडने घेतला. केन विल्यम्सनची फलंदाजी न्यूझीलंडच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी सामना पूर्ण झाला नाही. कदाचित डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे भारताला अमुक एक धावसंख्या २० षटकांमध्ये करावी लागली असती तर ते अडचणीचे झाले असते. परंतु उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी सुरू झाला. भारताने दुसऱ्या दिवशी २३ चेंडूंमध्ये केवळ २८ धावा देऊन उत्तम सुरुवात केली आणि न्यूझीलंडला २३९ धावांवर समाधान मानावे लागले.

न्यूझीलंडची ताकद ही गोलंदाजी असल्यामुळे भारताला २४० धावांचा पल्ला गाठणे सहज शक्य होणार नाही, असे मला वाटले होते. सातत्याने धावा करणारा एकमेव फलंदाज रोहित शर्मा केवळ १ धाव करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ लोकेश राहुल आणि भरवशाचा धावा करणारा फलंदाज कर्णधार विराट कोहलीसुद्धा प्रत्येकी एका धावेवर बाद झाले. तीन महत्त्वाचे फलंदाज माघारी पाठवण्याचे यश हे विल्यम्सनचे आहे. त्याने सुरेखरीत्या क्षेत्ररक्षण रचून कोहलीला फ्लिक करण्यास भाग पाडले आणि ट्रेंट बोल्टने उर्वरित कार्य पूर्ण केले. संपूर्ण विश्वचषकात भारतासमोरील मधल्या फळीच्या विशेषत: चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा गुंता कायम राहिला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंडय़ा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरती आल्यानंतर भागीदारी वाढवण्याऐवजी नको ते फटके खेळून बाद झाले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा मातबरांनी आपल्या संघाला अशा परिस्थितीतून तारले आहे. भारताकडे या दर्जाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये दिसले नाहीत. जे फलंदाज मधल्या फळीमध्ये खेळले त्यांच्या कौशल्याबद्दल कोणतीही शंका नाही; परंतु त्यांचा अनुभव आणि परिपक्वता कमी पडली.

क्रिकेट तीन टप्प्यांत खेळले जाते. पहिल्या तीन फलंदाजांचा एक टप्पा, चौथ्या, पाचव्या, सहाव्या फलंदाजाचा दुसरा टप्पा आणि बाकी फलंदाजांचा तिसरा टप्पा. बिकट परिस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील फलंदाजांनी संघाला बाहेर काढण्यासाठी चांगली खेळी करून धावसंख्या जवळ आणून ठेवतील. मग तिसऱ्या टप्प्यातील फलंदाज सामन्याचा शेवट चांगल्या प्रकारे करू शकतील. हे या सामन्यात न दिसल्याने भारत अडचणीत सापडला. भारत ३५ षटकेही खेळेल की नाही, अशी शंका असताना अखेपर्यंत झुंज दिली. हे रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या उत्तम भागीदारीमुळे शक्य झाले. चार षटके बाकी असताना धोनीने धावसंख्या वाढवण्याचा पवित्रा हाती घेणे गरजेचे होते; परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर धोनीने शेवटपर्यंत टिकून राहणे तेवढेच महत्त्वाचे होते.

भारताला अंतिम सामना गाठण्यात जरी अपयश आले असले तरी संपूर्ण विश्वचषकात भारत हा अजिंक्य संघासारखा खेळला. चाहते काही दिवसांनंतर हा सामना विसरतील; परंतु प्रत्येक खेळाडूला हा सामना कायमस्वरूपी स्मरणात राहील!