२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ मँचेस्टरच्या मैदानत समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद ने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. भारतीय संघाकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा धोनीचा ३४१ वा सामना ठरला आहे.

धोनीने भारतीय संघाचा माजी खेळाडू राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी धोनी आणि राहुल द्रविड हे ३४० सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर होते. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर ४६१ सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहे. गेल्या १३ वर्षांपासून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा अविभाज्य हिस्सा आहे.

विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने एकदाही भारतावर मात केली नाहीये. आतापर्यंतच्या लढतीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सहा सामने जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी कर्णधार विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाची मोठी गरज लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.