विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलाच मार पडला. भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना इंग्लंडने ३३७ धावांपर्यंत मजल मारली. मात्र भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली. शमीने इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत, अनोखी कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यांमध्ये ४ बळी घेणारा शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने अशी कामगिरी करुन दाखवली होती.

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये सलग सामन्यात ४ बळी घेणारा शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी नरेंद्र हिरवाणी यांनी १९८८ साली अशी कामगिरी करुन दाखवली होती.

मोहम्मद शमीने १० षटकात ६९ धावात ५ बळी घेतले, यात शमीने १ षटक निर्धावही टाकलं. शमीने इंग्लंडविरुद्ध जॉनी बेअरस्टो, जो रुट, इयॉन मॉर्गन, जोस बटलर आणि ख्रिस वोक्सला माघारी धाडलं.