भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (वन-डे, कसोटी आणि टी-२०) २० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. ही कामगिरी करताना विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा सर्वात जलद ओलांडण्याची कामगिरी विराटने विंडीजविरुद्ध सामन्यात करुन दाखवली आहे. दरम्यान अशी कामगिरी करणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या खेळाडूंनी ४५३ डावांमध्ये २० हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराटने मात्र ४१७ डावांमध्येच हा विक्रम आपल्या नावे जमा केला. अफगाणिस्तानच्या सामन्याआधी विराटच्या खात्यावर १९ हजार ८९६ धावा जमा होत्या. मात्र या सामन्यात विराटला १०४ धावांची खेळी करता आली नाही. या सामन्यात विराट ६७ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या सामन्यात आवश्यक असलेल्या ३७ धावा पूर्ण करत विराटने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग (४६८ डाव) तिसऱ्या स्थानावर आहे.