सचिन तेंडुलकरपाठोपाठ भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही भारतीय संघाच्या फलंदाजीवर टीका केली आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ विंडीजविरुद्ध सामन्यातही भारतीय फलंदाजी काहीप्रमाणात ढेपाळली. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि लोकेश राहुल यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक कामगिरी करु शकला नाही. या तिन्ही फलंदाजांनी केलेल्या खेळाच्या जोरावर भारताने २६८ धावांपर्यंत मजल मारली. विंडीजविरुद्ध सामन्यातही भारताचे फलंदाज फिरकीपटूंविरोधात बचावात्मक पवित्र्यात खेळताना दिसले.

भारतीय फलंदाजांच्या याच खेळावर विरेंद्र सेहवाग नाराज झाला आहे. फिरकीपटूंविरोधात बचावात्मक का खेळता? असा प्रश्न विचारत सेहवागने राशिद खान आणि फॅबिअन एलन या फिरकीपटूंची भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांविरोधातली कामगिरी सांगितली आहे.

महेंद्रसिंह धोनीने विंडीजविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावलं खरं, मात्र धावा करण्याच्या षटकांमध्ये त्याची बॅट शांत होती. फिरकीपटूंविरोधात धोनी, पांड्या हे फलंदाजही फारशी जोखीम घेण्याच्या तयारीमध्ये दिसत नव्हते. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरनेही धोनी आणि केदार जाधव यांच्या अफगाणिस्तानविरोधातील संथ खेळीवर टीका केली होती.