जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडने २०१९ मध्ये पहिल्यांदा वनडे वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. वर्ल्डकप मिळवून देण्यात उंचपुरा मध्यमगती गोलंदाज लायम प्लंकेटचा सिंहाचा वाटा होता. सात वर्षांनंतर प्लंकेट अमेरिकेत व्यावसायिक बेसबॉलपटू झाला आहे. स्पर्धात्मक पातळीवर बेसबॉल खेळणारा तो इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू झाला आहे. ‘अटलांटिक’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

पायोनियर लीगमध्ये ओकलँड बॅलर्स संघासाठी प्लंकेटने पदार्पण केलं. त्याने पाच पिचेस फेकले. बेसबॉलपटू हात अर्ध्यात वाकवून डोक्याच्या उंचीवरून फेकतात. क्रिकेटमध्ये चेंडू फेकताना हात सरळ असणं अपेक्षित असतं. गोलंदाजीची कौशल्यं घोटलेल्या ६ फुटांपेक्षाही जास्त उंच प्लंकेटने बेसबॉलमध्येही चांगली सुरुवात केली.

बेसबॉल खेळून झालं की प्लंकेट अमेरिकेतच सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट टी२० स्पर्धेत कॉमेंट्री करतो. प्लंकेट सॅन फ्रान्सिको युनिकॉर्न्स संघासाठी तीन हंगाम खेळला होता.

प्लंकेटने १३ टेस्ट, ८९ वनडे आणि २२ टी२० स्पर्धेत इंग्लंडचं प्रतिनिधित्व करताना दोनशेहून अधिक विकेट्स पटकावल्या आहेत. २०१९ वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांची टांकसाळच उघडली. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत टाकलं. प्लंकेट चर्चेत मागे राहिला पण त्याने स्पर्धेत ११ विकेट्स घेतल्या. मधल्या षटकांमध्ये धावा रोखणं, भागीदारी फोडणे ही कामं प्लंकेटने अचूकपणे केली. वेगापेक्षाही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात प्लंकेट वाकबगार मानला जायचा.

कसोटी प्रकारात श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी करायला प्लंकेटला आवडायचं. श्रीलंकेविरुद्ध त्याने ४ कसोटीत २१ विकेट्स पटकावल्या आहेत. गोलंदाजीच्या बरोबरीने प्लंकेट उपयुक्त खेळीही करत असे. दुखापतींनी सतावल्यामुळे प्लंकेट बराच काळ इंग्लंडसाठी खेळू शकला नाही. आयपीएल स्पर्धेत प्लंकेट दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने ७ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडमधल्या डरहॅम अकादमीचा प्लंकेट विद्यार्थी. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्लंकेट अमेरिकेला रवाना झाला. त्याची पत्नी अमेरिकेची आहे. त्यामुळेच त्याने मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोन हंगाम स्थानिक लीगमध्येही खेळला. या लीगमध्येच मार्केटिंगचं काम करणाऱ्या विल्यम फिट्झगेराल्डच्या माध्यमातून प्लंकेटला बेसबॉलसाठी विचारणा झाली. उंची, थ्रोइंगचा अनुभव असल्याने प्लंकेटने बेसबॉलमधल्या बाकी गोष्टी शिकून घेणं कठीण गेलं नाही.