येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (२ ऑगस्ट) जाहीर करण्यात आले आहे. भारताने अद्याप स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही. त्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो आशिया चषकामध्ये खेळणार नाही. तो आमचा प्रमुख गोलंदाज आहे. टी २० विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन करावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आशिया चषकामध्ये त्याला सहभागी करून धोका पत्करता येणार नाही. अशाने त्याची दुखापत वाढू शकते.

या महिन्यात होणाऱ्या आशिया चषकामध्ये भारत आपला सर्वोत्तम संघ उतरवू शकतो. विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जसप्रीत बुमराह आता खेळू शकणार नाही. २७ ऑगस्टपासून खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी आतापर्यंत फक्त पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे.

हेही वाचा – CWG 2022: पाकिस्तानच्या भालाफेकपटूने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; नीरज म्हणाला, “अर्शद भाई…”

यावेळच्या आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. मात्र, तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती बघता स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलवण्यात आली. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे टी २० फॉर्मेटमध्ये आशिया चषक खेळवला जाईल.