ढाका : बांगलादेश सरकारने मंगळवारी अमिनुल इस्लाम बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघटनेचे (बीसीबी) संचालक मंडळ बरखास्त करून दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी माजी कर्णधार तमिम इक्बालच्या नेतृत्वाखाली हंगामी समिती नियुक्त केली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेश संघाला भारतात पाठविण्यास नकार दिल्यामुळे जो गोंधळा निर्माण झाला, त्यामुळे बुलबुल यांना पदावरून हटवण्यात आल्याचे ‘बीसीबी’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

माजी अंतरिम सरकारी सल्लागार आसिफ नझरुल यांनी बांगलादेश संघाला भारतात जाण्यापासून रोखले होते. त्यांनी कोलकाता आणि मुंबई येथे होणारे बांगलादेश संघाचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. यामागे ‘आयपीएल’मधून मुस्तफिझूर रहमानला वगळल्याचा निषेध हे कारण होते. या संपूर्ण प्रकरणात बुलबुल निष्क्रिय राहिल्याचा आरोप असून गेल्या काही दिवसांत ‘बीसीबी’चे सहा संचालक त्यांच्या विरोधात राजीनामा देऊन बाहेर पडले होते.

बांगलादेशात नवे सरकार आल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या ‘बीसीबी’च्या निवडणुकांबाबतच्या विविध आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीच्या शिफारशींनंतर राष्ट्रीय क्रीडा परिषदेने (एनएससी) बुलबुल यांना ‘बीसीबी’च्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला.

आता ३७ वर्षीय तमिम इक्बालच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यीय हंगामी समिती मंडळाचे दैनंदिन कामकाज पाहिल, शिवाय पुढील ९० दिवसांत ‘बीसीबी’च्या निवडणुका घेण्याची जबाबदारी या समितीवरच असेल.

‘‘विद्यमान बीसीबी संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आणि हंगामी समिती नेमण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवण्यात आला आहे. ‘आयसीसी’च्या नियमांनुसार सरकारी हस्तक्षेप मान्य नसला तरी, निवडणुका किती दिवसांत घेणार हे जाहीर केल्यामुळे ‘बीसीबी’वर बंदी येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे राष्ट्रीय क्रीडा परिषदेचे संचालक अमिनुल एहसान यांनी सांगितले.