मुंबई : सलामीवीर सनत सांगवानच्या (११८) शतकानंतरही दिल्लीचा संघ मुंबईविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘ड’ गटाच्या सामन्यात पहिल्या डावात २२१ धावांत गारद झाला. मुंबईसाठी मोहित अवस्थीने (५/६२) भेदक गोलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. यानंतर मुंबईने पहिल्या दिवसअखेर १ बाद १३ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा अखिल हेरवाडकर (नाबाद ४) व तुषार देशपांडे (नाबाद ०) मैदानावर होते. वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ अकादमीच्या मैदानावर सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीसाठी सांगवानने एक बाजू धरून ठेवताना हंगामातील तिसरे शतक साकारले. मात्र, दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला फारशी साथ मिळाली नाही.

सांगवानने शतकी खेळीदरम्यान २१८ चेंडूंत सामना करताना ११ चौकार व दोन षटकार लगावले. सांगवानने वैभव कांडपालसह (३२) दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी रचली. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला संघ भक्कम स्थितीत होता. पहिल्या सत्रात दिल्लीने १ बाद १११ धावा केल्या होत्या. मात्र, उपाहारानंतर अवस्थीने सहा षटकांच्या स्पेलमध्ये दिल्लीचे तीन फलंदाज बाद करत मुंबईला पुनरागमन करवून दिले. अवस्थीने दिल्लीचा कर्णधार आयुष डोसेजा (०), सुमित माथुर (२) आणि पदार्पणवीर आर्यन राणा (१०) यांना झटपट माघारी धाडले.

यानंतर तळाच्या फळीत प्रणव राजवंशी (३९) यालाच प्रतिकार करता आला. गोलंदाजीत अवस्थीला अनुभवी शम्स मुलानी (२/४५) आणि तुषार देशपांडे (२/३६) यांची चांगली साथ मिळाली. दिल्लीने अखेरचे नऊ फलंदाज केवळ ११० धावांत गमावले. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेल्या मुंबईने सलामीवीर आकाश आनंदला (४) सुरुवातीलाच गमावले. त्यानंतर तुषार देशपांडेला ‘नाइट वॉचमन’ म्हणून पाठविण्यात आले. त्याने आणि हेरवाडकरने दिवसाच्या अखेरचे चेंडू खेळून काढण्यात यश मिळवले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली (पहिला डाव) : ७६.४ षटकांत सर्वबाद २२१ (सनत सांगवान ११८, प्रणव राजवंशी ३९, वैभव कांडपाल ३२; मोहित अवस्थी ५/६२, तुषार देशपांडे २/३६, शम्स मुलानी २/४५)

मुंबई (पहिला डाव) : ३ षटकांत १ बाद १३ (अखिल हेरवाडकर नाबाद ४, आकाश आनंद ४; दिविज मेहरा १/४).