बीसीसीआयने (BCCI) नेमलेल्या समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला मुलाखत देण्यासाठी तयार न झाल्याने धमकावल्याप्रकरणी आपला अहवाल सादर केलाय. यात समितीने टॉक शोचे होस्ट बोरी मुजुमदार यांना दोषी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे बीसीसीआय पत्रकार मुजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याची शक्यता आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर संडे एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, “आम्ही भारतीय क्रिकेट मंडळाच्या सर्व राज्य विभागांना बोरी मुजुमदार यांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याबाबत सांगणार आहोत. त्यांना भारतातील रणजी क्रिकेट सामन्यांसाठी देखील पत्रकार म्हणून मान्यता दिली जाणार नाही. याशिवाय आयसीसीला मुजुमदार यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी विनंती केली जाईल. तसेच खेळाडूंना त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्यास सांगितले जाईल.”

या प्रकरणावर बोरी मुजुमदार यांची बाजू जाणून घेण्यासाठी शनिवारी (२३ एप्रिल) कॉल आणि टेक्स्ट मेसेजद्वारे प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नेमकं प्रकरण काय?

पश्चिम बंगालमधील ३७ वर्षीय यष्टीरक्षक वृद्धिमान सहाने १९ फेब्रुवारीला एक ट्वीट केलं. यात त्याने पत्रकार मुजुमदार यांच्याकडून केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट पोस्ट केला. तसेच लिहिलं, “भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानानंतर एका कथित आदरणीय पत्रकाराकडून मला हे सहन करावं लागत आहे. या पातळीवर पत्रकारिता पोहचली आहे.”

साहाने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये पत्रकार मुजुमदार साहाला मुलाखतीसाठी तयार न झाल्याने, फोन करून रिसिव्ह न केल्याने आणि कॉल बॅक न केल्याने अपमान झाल्याचं बोलत आहे. तसेच हा अपमान मी लक्षात ठेवेल, असं म्हणत अप्रत्यक्ष धमकी देताना दिसत आहे. दुसरीकडे बोरी मुजुमदारने साहाने शेअर केलेला स्क्रिनशॉट एडिटेड असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा : मोठ्या संकटात सापडणार वृद्धिमान साहा? BCCI ‘असा’ निर्णय घेण्याच्या तयारीत!

साहाने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर मांडल्यानंतर क्रिकेटविश्वातून त्याला चांगला पाठिंबा मिळाला. माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. यानंतर बीसीसीआयने एक समितीचं गठन केलं. यात उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरूण धुमाळ, प्रभुतेज भाटिया यांचा समावेश होता. या समितीने आता अहवाल सादर केलाय.