चेन्नई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वे संघाचे चेन्नईच्या ‘चेपॉक’ स्टेडियमवर सराव सत्र झाले. यावेळी एक व्यक्ती लक्ष वेधून घेत होती… ब्रेंडन टेलर, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि सध्याच्या संघातील यष्टिरक्षक-फलंदाज. सुरुवातीच्या सामन्यात पायाला दुखापत झाली आणि टेलरला स्पर्धेबाहेर जावे लागले. मात्र, स्वत: जायबंदी असूनही तो नेट्समध्ये झिम्बाब्वेच्या फलंदाजांना सरावासाठी मदत करत होता.

झिम्बाब्वे संघाचे बुधवारी सहा-सव्वासहा वाजता सराव सत्र सुरू झाले. सुरुवातीला ब्लेसिंग मुझराबानी आणि अन्य गोलंदाजांनी प्रमुख फलंदाजांविरुद्ध सराव केला. त्यानंतर पुढील दिवसाचा भारताविरुद्धचा महत्त्वाचा सामना लक्षात घेत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली.

अशा वेळी टेलरने ‘थ्रो-डाऊन’ करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला. पायाला लागले असल्याची त्याने जराही पर्वा केली नाही. त्याने जवळपास सायंकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत फलंदाजांना ‘थ्रो-डाऊन’ दिले. यावेळी तो अनेकदा फलंदाजांना मार्गदर्शनही करताना दिसून आला. त्यानंतर सामन्याच्या दिवशीही तो खेळाडूंशी संवाद साधताना दिसला. झिम्बाब्वे संघाला कोणत्याही पद्धतीने मदत करण्याची माझी तयारी असल्याचे टेलर सांगतो. याचे उदाहरण यंदाच्याच स्पर्धेत यापूर्वीही मिळाले होते.

झिम्बाब्वेच्या सलामीच्या लढतीत ओमानविरुद्ध टेलरने नाबाद ३१ धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. असे असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात तो यष्टिरक्षणाचे पॅड घालून बसला होता. या सामन्यासाठी झिम्बाब्वेकडे केवळ १३ तंदुरुस्त खेळाडू होते. त्यातच कर्णधार सिकंदर रझा आणि मुझराबानी यांना मैदानाबाहेर जावे लागल्याने झिम्बाब्वे संघ अडचणीत सापडला होता.

परंतु रझा आणि मुझराबानी वेळेत परतल्याने टेलरला मैदानात उतरण्याची वेळ आली नाही. मात्र, या कृतीने त्याची झिम्बाब्वे क्रिकेटसाठीची तळमळ अधोरेखित झाली होती. ४० वर्षीय टेलरची क्रिकेट कारकीर्द मैदानावर आणि मैदानाबाहेरही अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. झिम्बाब्वेच्या सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये टेलरची गणना केली जाते.

मात्र, गेली काही वर्षे त्याच्यासाठी अतिशय खडतर होती. अमली पदार्थ आणि मद्य सेवनाच्या जाळ्यात तो अडकला होता. याचा काहींनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याला ‘स्पॉट फिक्सिंग’ (स्थळनिश्चिती) करण्यासाठी प्रवृत्त केले आणि ऐकले नाही, तर त्याचे व्यसन जगासमोर आणण्याची धमकी दिली.

टेलर सुरुवातीला घाबरला, मग चार महिन्यांनी त्याने ‘आयसीसी’ला याबाबतची माहिती दिली. मात्र, ‘आयसीसी’च्या नियमानुसार, सामना किंवा स्थळनिश्चितीसाठी कोणीही प्रवृत्त केल्यास खेळाडूने त्याची त्वरित माहिती पुरवणे बंधनकारक असते. टेलरने तसे न केल्याने त्याच्यावर साडेतीन वर्षांची बंदी घालण्यात आली. परंतु निराश न होता त्याने सकारात्मक पद्धतीने या परिस्थितीकडे पाहिले.

व्यसनमुक्त होण्यासाठी तो स्वत:हून पुनर्वसन केंद्रात गेला. त्याने घरातच क्रिकेटचे प्रशिक्षण केंद्र उभारले. भविष्यात प्रशिक्षक होण्याच्या दृष्टीने त्याने हे पाऊल उचलले. याच दरम्यान, तो क्रिकेटमधून निवृत्तही झाला. मात्र, २०२७ सालचा एकदिवसीय विश्वचषक आफ्रिकेत होणार असल्याने त्यात आपले सर्वोत्तम खेळाडू खेळावेत अशी झिम्बाब्वेची धारणा आहे. त्यामुळे त्यांनी टेलरला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली. ‘आयसीसी’ने घातलेल्या बंदीचा कालावधी संपल्यानंतर टेलरने निवृत्ती मागे घेतली आणि तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला.

आता दुखापतीने टेलरची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी हिरावून घेतली असली, तरी तो अन्य माध्यमांतून झिम्बाब्वे संघाला मदत करत आहे. तो कर्णधार नसला, तरी संघातील सर्वांत अनुभवी खेळाडूला आवश्यक सर्व जबाबदार्‍या तो नेटाने पार पाडत आहे. त्यामुळेच झिम्बाब्वे क्रिकेटच्या वाटचालीत त्याची भूमिका अजूनही महत्त्वाची ठरते आहे.