चेन्नई : भारताच्या पहिल्या कसोटी विजेत्या क्रिकेट संघाचे सदस्य सीडी गोपीनाथ यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मुंबईचे ९५ वर्षीय चंद्रकांत पाटणकर हे आता हयात असणारे देशातील सर्वांत वयस्क क्रिकेटपटू आहेत. पाटणकर यांनी १९५५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता.

सीडी गोपीनाथ यांच्या निधनाने भारताच्या पहिल्या कसोटी विजयाशी जोडलेली शेवटची मानवी कडीही तुटली असे मानले जात आहे. १९५२ मध्ये चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या भारताच्या पहिल्या कसोटी विजयाच्या आठवणी ते मोठ्या उत्साहाने सांगत.

गोपीनाथ यांनी भारतासाठी आठ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी २४२ धावा केल्या आणि एक अर्धशतक साकारले. १९५१ मध्ये ब्रेबॉर्न येथे कसोटी पदार्पणात त्यांनी इंग्लंडविरुद्ध ५० आणि ४२ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतरच्या इंग्लंड दौर्यात त्यांनी फारशी समाधानकारक कामगिरी न केल्याने त्यांना पुढे संघात सातत्याने स्थान मिळू शकले नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र गोपीनाथ यांनी मोठे योगदान दिले. मद्रास संघाकडून त्यांनी ८३ सामन्यांत ४२५९ धावा केल्या, ज्यात नऊ शतकांचा समावेश होता. न्यूझीलंड दौर्यात दक्षिण विभागाकडून खेळताना त्यांनी दुसर्या डावात केलेली १७५ धावांची खेळी विशेष गाजली. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले.