बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघाच्या पहिल्या ‘आयपीएल’ विजेतेपदाच्या जल्लोष सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे निर्माण झालेली अनेक महिन्यांची अनिश्चितता अखेर संपली आहे. कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) आणि बंगळूरु संघाला ‘आयपीएल’च्या आगामी हंगामात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

जगातील सर्वांत मोठी ट्वेन्टी-२० फ्रँचायझी लीग अशी ख्याती असलेल्या ‘आयपीएल’च्या १९व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. वेळापत्रकानुसार, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक आणि राज्य सरकारने नेमलेली तज्ज्ञ समिती, ‘केएससीए’, ‘आरसीबी’ आणि त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ‘डीएनए’ यांच्यातील चर्चेनंतर मंजुरीचा निर्णय घेण्यात आला.

‘‘बैठकीदरम्यान तज्ज्ञ समितीने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील सज्जता आणि सुरक्षा उपायांच्या पालनाचा अहवाल सादर केला. या शिफारशींच्या आधारे आणि व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर, गृहमंत्र्यांनी आगामी ‘आयपीएल’ सामन्यांच्या आयोजनास अधिकृत मान्यता दिली आहे,’’ असे ‘केएससीए’चे प्रवक्ते विनय मृत्युंजय यांनी एका निवेदनात सांगितले.

चिन्नास्वामी स्टेडियमवर सलामीच्या सामन्याव्यतिरिक्त ‘आरसीबी’ संघाचे विविध कार्यक्रम, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आयोजित केला जाणार आहे. ‘आरसीबी’ने यापूर्वीच जाहीर केले आहे की ते सातपैकी पाच घरचे सामने बंगळूरुमध्ये खेळतील, तर दोन सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील.

गतवर्षी ‘आरसीबी’ने विजेतेपद मिळविल्यानंतर ४ जून २०२५ रोजी विजयाचा उत्सव साजरा होत असताना चिन्नास्वामी स्टेडियम-जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकारने जोपर्यंत सुरक्षा मानके आंतरराष्ट्रीय दर्जाची होत नाहीत, तोपर्यंत या मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामन्यांवर बंदी घातली होती.