क्रिकेटची पंढरी अशी ओळख असणाऱ्या लंडनमधील प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदाच मुस्लीम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. लॉर्ड्स मैदानावरील ‘लाँग रूम’ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या (ECB) आयटी हेल्पडेस्कच्या व्यवस्थापक तमिना हुसेन यांनी आयोजित केला होता.

यावेळी इफ्तार पार्टीच्या सुरुवातीला मौलवी हसेन रसूल यांनी अजान दिलं आणि मग उपस्थितांनी नमाज पठण केलं. यानंतर उपस्थितांपैकी काही मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली. मौलवी हसेन रसूल म्हणाले, “मी अजान देत होतो तेव्हा मला या स्थळाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची अनुभूती येत होती. परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण मानवतेप्रमाणेच दिसत होता.”

ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ECB CEO) टॉम हॅरिसन या इफ्तार पार्टीवर बोलताना म्हणाले, “इफ्तार पार्टीची सायंकाळ म्हणजे क्रिकेटच्या प्रेमातून सर्वांशी जोडलं जाणं आणि सोबतच एकमेकांच्या संस्कृतीविषयी खोलात समजून घेण्याचा प्रयत्न होता.”

हेही वाचा : सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी शालेय मुलांना अनोखी इफ्तार पार्टी

लॉर्ड्सवरील या इफ्तार पार्टीत इंग्लडचा कर्णधार इयोन मॉर्गन, माजी कर्णधार ग्राहम गूच, लिडिया ग्रीनवे आणि टॅमी बॉमॉन्ट देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मॉर्गनने ट्वीट करत इफ्तार पार्टीची सायंकाळ खूप आनंदी असल्याचं सांगितलं. तसेच ही लॉर्ड्सवरील आतापर्यंतची पहिलीच इफ्तार पार्टी असल्याचंही त्याने नमूद केलं.