Gautam Gambhir Coach Performance / मुंबई : गुवाहाटीतील विक्रमी पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ०-२ अशी गमावली. न्यूझीलंडपाठोपाठ दोन वर्षांत भारताने अनुभवलेला हा दुसरा ‘व्हाईट वॉश’! दोन्ही पराभवांमध्ये कर्णधार वेगवेगळे होते, तरी प्रशिक्षक, मार्गदर्शक एकच होता – गौतम गंभीर! रवी शास्त्री किंवा राहुल द्रविड यांच्या काळातही भारतीय संघाने पराभव पाहिले, पण ते इतक्या सातत्याने होत नव्हते.
एरवी भारतीय संघ हा केवळ इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याशीच तुल्यबळ आहे. बाकीच्यांना आपण गणत नाही. किमान घरच्या मैदानांवर तरी दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडसारख्या संघांशी आपण इतक्या सातत्याने पराभूत होत नव्हतो. किंबहुना यांच्याविरुद्ध आपण निर्भेळ मालिका न जिंकणे हेच आपल्यासाठी कमीपणाचे मानले जायचे.
पण आज परिस्थिती अशी आहे, की श्रीलंका किंवा पाकिस्तानसारखे संघही भारतात येऊन भारताला हरवण्याची स्वप्ने पाहू शकतात. पाकिस्तानच्या बाबतीत हे नजीकच्या भविष्यात अजिबातच शक्य नाही हे कबूल. पण इतर कोणत्याही मुख्य प्रवाहातील कसोटी संघावर घरच्या मैदानांवर दोन वर्षांत दुसऱ्यांदा व्हाईट वॉशची नामुष्की ओढवलेली नाही हे वास्तव अद्याप फार कुणाच्या लक्षात आलेले नाही.
Gautam Gambhir | ‘प्रशिक्षक’ गंभीरची सुमार कामगिरी
शुभमन गिलची अनुपस्थिती हा भारताला बसलेला पहिला फटका होता. पण बलाढ्य संघांना अशा परिस्थितीत सावरण्याची कला अवगत असणे अपेक्षित असते. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन दौऱ्यात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीसह भारताचे एकाहून एक अतिरथी क्रिकेटपटू जायबंदी किंवा इतर कारणांमुळे दौऱ्यातून बाहेर पडत होते.
अशा परिस्थितीतही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पूर्ण ताकदीनिशी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध २-१ असा सनसनाटी विजय नोंदवला. याचे कारण अजिंक्यला एका मर्यादेपलीकडे सल्ला देण्याच्या भानगडीत शास्त्री कधी पडायचे नाहीत. हेच पथ्य राहुल द्रविडनेही मार्गदर्शक म्हणून पाळले. पण गंभीर संघाचा प्रशिक्षक म्हणून नेमला गेल्यानंतर काही बदल झपाट्याने घडत गेले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघा सिनियर क्रिकेटपटूंनी कसोटी आणि टी-२० प्रकारात निवृत्ती जाहीर केली. रविचंद्रन अश्विनही त्याच मार्गाने गेला. तिघांच्याही निर्णयात गंभीरच्या हट्टाग्रहाचा वाटा अधिक होता. सिनियर क्रिकेटपटूंना पेन्शनीत पाठवण्यात चूक काही नाही. पण त्यांची जागा घेऊ शकतील असे क्रिकेटपटू तयार नसतील, तर असे निर्णय आत्मघातकी ठरतात. कसोटी क्रिकेटमधील व्यूहरचना आणि नियोजन हा गंभीरचा प्रांत नसल्याचेच त्याची आजवरची कामगिरी दर्शवते.
मायभूमीत मानहानी
बांगलादेशाविरुद्ध घरच्या मालिकेत २-० असा विजय, न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत ०-३ असा पराभव, ऑस्ट्रेलियाविरुद्ध परदेशी मालिकेत (पहिली कसोटी जिंकूनही) १-३ असा पराभव, इंग्लंडविरुद्ध परदेशी मालिकेत २-२ अशी बरोबरी, वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मालिकेत २-० असा विजय आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मालिकेत ०-२ असा पराभव ही एकत्रित कामगिरी भारताच्या घरच्या मैदानांवरील रेकॉर्डचा अंदाज घेता सुमार मानावी लागेल.
सन २०१२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका १-२ अशी गमावली होती. त्यानंतर २०२४ आणि २०२५ अशी पाठोपाठची वर्षे आपण घरच्या मालिकांमध्ये एकही कसोटी सामना न जिंकता त्या गमावत आहोत, याचे अपश्रेय गंभीरलाच द्यावे लागेल. २०१२नंतरच्या १२ वर्षांमध्ये भारत विक्रमी १७ घरच्या मालिकांमध्ये अपराजित राहिला होता. त्या विक्रमाची आज चर्चाही होत नाही.
Shubman Gill | गिलची अनुपस्थिती
इंग्लंड मालिकेत धावांच्या राशी रचणारा शुभमन गिल या मालिकेत भारताला फारसा लाभलाच नाही. पहिल्या कसोटीत बहुतेक काळ तो मानेच्या दुखापतीमुळे अनुपस्थित राहिला. दुसऱ्या कसोटीत तर तो उतरलाच नाही. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने भारताचे नेतृत्व केले, पण कसोटीतील नेतृत्व हा ऋषभचा प्रांत नाही हे या निमित्ताने सिद्ध झाले. दोन्ही कसोटींमध्ये मोजकीच सत्रे भारताचे वर्चस्व राहिले. त्या सत्रांना वर्चस्वात परिवर्तित करण्यात ऋषभ पंत आणि गौतम गंभीर सपशेल अपयशी ठरले.
सायमन हार्मर आणि मार्को यान्सेन या दोघांनी अनुक्रमे १७ आणि १२ बळी मिळवले. हार्मरसमोर सर्व भारतीय फिरकी गोलंदाज आणि यान्सेनसमोर बुमरा आणि सिराज फिके पडले. त्यामुळे एकास एक कौशल्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारी पडत असताना, या परिस्थितीतून मानसिक आणि डावपेचात्मक उभारी देण्याची जबाबदारी पंत-गंभीर सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडमध्ये भारताच्या दोन विजयांत गिलच्या धावा हा घटक निर्णायक ठरला होता. यंदा तो नव्हता, त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भारताकडे त्या दर्जाचे फलंदाजच नव्हते. तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर नि चौथ्या क्रमांकावर ध्रुव जुरेल अशी भारताची फलंदाजी कसोटी दर्जाची मानता येत नाहीच.
कसोटी दर्जात ‘गंभीर’ कडेलोट
गौतम गंभीरची सामनोत्तर पत्रकार परिषद त्याच्या स्वभावाचे निदर्शक होती. टी-२० आशिया चषक आणि चँपियन्स करंडक विजेत्या संघाचे प्रशिक्षकही आपण होतो, असे स्मरण त्याला करून द्यावे लागले. मग कसोटी क्रिकेटमधील सध्याची स्थिती ही संक्रमणामुळे (ट्रान्झिशन) दिसून येत असल्याचा त्याचा दावा होता. अशी संक्रमणे यापूर्वीही आली होती. त्यावेळी भारताची स्थिती इतकी दयनीय नव्हती. आज परिस्थिती अशी आहे, की शीर्षस्थ दोन-तीन कसोटी संघांमध्ये भारताची गणना करता येत नाही.
मोहम्मद शमी, सर्फराझ खानसारख्या गुणी क्रिकेटपटूंना वारंवार संधी नाकारणे किंवा साई सुदर्शन, नीतीश रेड्डीसारख्या सुमारांवर वारंवार विश्वास दाखवणे, यजुवेंद्रसारख्या अस्सल आणि गुणी फिरकी गोलंदाजाची कसोटी कारकीर्द जवळपास संपवणे हे पाप गंभीरचेच. कसोटी क्रिकेटमध्ये भारताला येथून पुढे उभारी घ्यायची असेल, तर प्रथम गौतम गंभीरची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करावी लागेल. किमान त्याला केवळ पांढऱ्या चेंडूंच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून राहू द्यावे, पण कसोटीसाठी आणखी एखाद्याची निवड ही काळाची गरज आहे.
siddharth.khandekar@expressindia.com
