मुल्लानपूर : मायदेशात गेल्या तीनपैकी दोन कसोटी मालिकांत हार पत्करण्याची नामुष्की भारतीय क्रिकेट संघावर ओढवली. आता संक्रमणावस्थेतील भारतीय संघासमोर तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तानचे आव्हान असून उभय संघांतील एकमेव कसोटी सामन्याला आज, शनिवारपासून प्रारंभ होणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान संघांत यापूर्वी केवळ एक कसोटी सामना झाला आहे. २०१८ मध्ये बंगळूरु येथे झालेल्या सामन्यात भारताने अवघ्या दोन दिवसांत अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. मात्र, त्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे यावेळी न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर येथे होणार्‍या एकमेव कसोटीत अफगाणिस्तान संघ भारताला झुंज देणे अपेक्षित आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघ अनुभवाच्या आघाडीवर अधिकच कमकुवत झाला आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला युवकांवर अवलंबून राहावे लागेल.

जडेजाचा उत्तराधिकारी कोण?

रवींद्र जडेजा या सामन्यात खेळणार नाही. तो आता ३७ वर्षांचा असून आणखी किती काळ कसोटी क्रिकेट खेळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने त्याचा उत्तराधिकारी शोधण्यास सुरुवात केली आहे. या कसोटीसाठी त्याच्यासारखीच शैली असलेला विदर्भाचा हर्ष दुबे आणि राजस्थानचा मानव सुथार यांना चमूत स्थान मिळाले आहे. यापैकी सुथार अधिक कौशल्यपूर्ण फिरकीपटू असला, तरी फलंदाजीत हर्ष दुबे अधिक उजवा ठरतो. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

तिसर्‍या क्रमांकावर साईच

गेल्या दोन मालिकांतील सहा कसोटीत मिळून साई सुदर्शनला केवळ २७.४५च्या सरासरीने ३०२ धावाच करता आल्या. त्याने अद्याप एकही शतक केलेले नाही. असे असले तरी तिसर्‍या क्रमांकासाठी साईला पसंती देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. ‘‘साईला पुरेशी संधी मिळालेली नाही. त्याने कसोटी कारकीर्दीची सुरुवात इंग्लंडमध्ये केली. तिथे फलंदाजी करणे किती आव्हानात्मक असते हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने ‘आयपीएल’मध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्यावरील विश्वास कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला.

गुलाबी चेंडूच्या वापराचे गंभीरकडून स्वागत

मुल्लानपूर : कसोटी सामन्यांमध्ये अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागू नये यासाठी आता गुलाबी चेंडूच्या वापरास परवानगी देण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णयाचे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्वागत केले. हवामानातील बिघाडामुळे प्रभावित होणार्‍या कसोटीत निकाल मिळवण्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर ही एक उत्तम संधी असल्याचे तो म्हणाला. अंधूक प्रकाशामुळे वाया जाणारा खेळ वाचवण्यासाठी दोन्ही संघांच्या पूर्वसंमतीने नियमित कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरण्याच्या चाचणीला ‘आयसीसी’ने मंजुरी दिली आहे. सामन्यांची सुरुवात लाल चेंडूनेच होईल, परंतु प्रकाशाची कमतरता निर्माण झाल्यास प्रकाशझोत लावून गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल. ‘‘यामुळे दिवसा खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यातही निकाल मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध राहणार आहे,’’ असे गंभीर म्हणाला.

संघ

* भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल (दोघे यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मानव सुथार, हर्ष दुबे.

* अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, रहमानुल्ला गुरबाज, रहमानुल्ला, अफसर झझाई, इकराम अलीखिल (दोघे यष्टिरक्षक), सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, अझमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगेलिया खारोटे, बिलाल सामी, कैस अहमद, मोहम्मद सलीम, झियाउर रहमान.

* वेळ : सकाळी ९.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.