ब्रिस्बेन : ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये जेतेपद मिळविल्यानंतर भारतीय महिला संघाचे लक्ष्य आज, मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणार्या एकदिवसीय सामन्यांतही आपली लय राखण्याचे असेल.

भारताने गेल्या वर्षी नवी मुंबईत झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमविले होते. ही मालिकेतून अलिसा हिली ही एकदिवसीय प्रारूपातून निवृत्ती घेणार आहे. भारताविरुद्ध सहा मार्चपासून पर्थ येथे होणारी कसोटी तिच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून बाहेर राहिल्यानंतर हीलीचे पुनरागमन झाले आहे.

भारताने ट्वेन्टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. गेल्या दशकातील कोणत्याही प्रारूपातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा भारताचा मोठा विजय आहे. लेग स्पिनर अलाना किंगने एकदिवसीय व कसोटी संघात पुनरागमन केले आहे. भारतासाठी काश्वी गौतम, हरलीन देओल आणि प्रतिका रावल संघात अरुंधती रेड्डी, भारती फुलमाळी आणि श्रेयांका पाटील यांच्या जागी आल्या आहेत.

तारांकित फलंदाज स्मृती मनधानाने तिसर्या ट्वेन्टी-२० मध्ये ८२ धावांची खेळी केली होती. आपली हीच लय कायम राखण्याचा तिचा प्रयत्न असेल. जेमिमा रॉड्रिग्ज चांगल्या लयीत आहे. तिने तिसर्या ट्वेन्टी-२० मध्ये ५९ धावा केल्या. गोलंदाजीत रेणुका सिंह ठाकूर आणि श्री चरणी यांनी चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघात सामना जिंकवून देणार्या खेळाडूंची कमतरता नाही. ॲलिस पेरी, ॲश्ले गार्डनर, बेथ मूनी, तहलिया मॅकग्रा, हिली आणि किंग कोणत्याही स्थितीत कामगिरी करण्यात सक्षम आहेत.

  • वेळ : सकाळी ९.२० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३, जिओहॉटस्टार ॲप.