चेन्नई : ट्वेन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल आठ’ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला भारताचा पराभव अजूनही विसरता येत नाही. त्याचमुळे आता आव्हान राखण्यासाठी भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही सामन्यांत विजय आवश्यक असून, त्या दृष्टीने प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. चेन्नईतील ‘चेपॉक’ मैदानाची खेळपट्टी यजमान भारताला साजेशी अशी मिळू शकते. त्यासाठी तीन खेळपट्टी तयार ठेवण्यात आल्या आहेत.
स्पर्धेपूर्वी सर्वोत्तम क्रिकेट खेळणार्या भारताला स्पर्धेत मात्र खेळलेल्या एकाही केंद्रावर फलंदाजीची लय राखता आलेली नाही. आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. घरच्या मैदानावर आपल्याचसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टींच्या स्वरूपाशी जुळवून घेण्यात भारताला कठीण गेले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पर्धेवर लक्ष ठेवून सुरुवातीपासून सपाट खेळपट्ट्यांवर खेळणे पसंत केले. मात्र, या खेळपट्ट्या त्यांच्या पसंतीस उतरलेल्या नाहीत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर चेन्नईत भारताला त्यांना हवी तशी खेळपट्टी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामन्यासाठी एक लाल मातीची, तर दोन काळ्या मातीच्या अशा तीन खेळपट्ट्या तयार ठेवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यातील कुठली खेळपट्टी वापरायची याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेणार आहे.
अर्थात, खेळपट्टी कुठलीही निवडली, तरी ती फलंदाजीसाठी अनुकूल असणार यात शंका नाही. ‘चेपॉक’ येथे सहा सामने खेळविण्यात आले होते. यात साखळी गटात प्रथम फलंदाजी करणार्या संघाने सर्वात कमी म्हणजे १७३ अशी धावसंख्या उभारली. दोनशे ही येथील सर्वाधिक धावसंख्या ठरली होती.
पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचे १८३ धावांचे आव्हान न्यूझीलंडने तेरा चेंडू शिल्लक असतानाच पार केले. लाल मातीवर झालेल्या अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानने ४ बाद २०० धावा केल्या होत्या. येथील खेळपट्टीचा एक पैलू म्हणजे येथे चेंडू चांगला उसळी घेत आहे. आतापर्यंत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांसाठी आवडते असलेले हे मैदान चार वर्षांपासून मात्र चांगले बदलले आहे. आता येथे १८० ते २०० धावा सामान्य झाल्या आहेत.
खेळपट्टीच्या स्वरूपाचा ताण
आतापर्यंत खेळपट्टीच्या स्वरूपाशी जुळवून घेण्यात अपयश आल्यामुळे भारताने आपले अधिक लक्ष खेळपट्टीच्या स्वरूपावर केंद्रित केले आहे. मुंबईत अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून भारताला त्यांच्या पसंतीची खेळपट्टी मिळालेली नाही. दिल्ली आणि अहमदाबाद येथे भारताने अखेरचे दोन सामने खेळले आहेत. तेथील खेळपट्ट्या या धिम्या होत्या. विशेष म्हणजे भारताने अशा वेळी अद्याप अजून आपला दुसरा पर्याय वापरलेला नाही. ‘अव्वल आठ’ मधील भारताचा अखेरचा सामना ईडन गार्डन्सवर आहे. जेथे सहसा यजमानांच्या पसंतीनुसार खेळपट्ट्या तयार केल्या जात नाहीत. याचाच अर्थ की भारताला आता परिस्थितीवर मात करावी लागणार आहे.
आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याकडेच पाहायचे झाले, तर भारतीय संघ त्यांच्या रणनीतीचा पुनर्विचार करत असल्याचे समजते. प्रमुख तीन फलंदाज डावखुरे असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघ ऑफ स्पिन गोलंदाज खेळविण्याचे नियोजन करत आहे. संघ व्यवस्थापन हे नियोजन मोडणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. मक्तेदारी मोडण्यासाठी संजू सॅमसनला सलामीला पसंती मिळू शकते.
झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांत ऑफ स्पिनर आहेत आणि भारतीय संघ आता अशा वळणावर आहे की जिथे त्यांना आघाडीच्या फळीला फलंदाजीत आलेले अपयश विसरून चालणार नाही. सरावाला सोमवारी एका दिवसाची सुट्टी देण्यात आली असली, तरी मंगळवारपासून संघ व्यवस्थापन उर्वरित दोन सामन्यांसाठी पूर्ण संतुलित आणि सर्व परिस्थितींना तोंड देणारा संघ निवडण्याचा विचार करेल.
नेमकी कशी असेल खेळपट्टी
सामन्यासाठी तीन खेळपट्ट्या तयार असल्या तरी त्या नेमक्या कशा असतील हे कुणीच सांगू शकत नाही. दोन काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांपैकी एका खेळपट्टीवर अजिबात गवत नाही, तर दुसरी हिरवीगार दिसून येत आहे. अशा खेळपट्ट्या या स्पर्धेत बहुतेक ठिकाणी दिसून आल्या. बॅट आणि चेंडू यांच्यात समान स्पर्धा व्हावी यासाठी खेळपट्टीवर थोड्या प्रमाणात गवत ठेवण्यात आले आहे.
तिसरी खेळपट्टी मात्र पूर्ण लाल मातीची आहे. मात्र, खेळपट्टीचे स्वरुप आणि यजमान संघाचा फायदा यात आतापर्यंत कायम विरोधाभास दिसून आला आहे. मंगळवारच्या सरावानंतर खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीची संमिश्र असेल असे बोलले जात आहे. यात नंतरचा म्हणजे काळी माती वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा आहे.
वॉशिंग्टनसह अक्षरला संधी?
दक्षिण आफ्रिका संघात चार डावखुरे फलंदाज असल्यामुळे ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला खेळविण्याचा निर्णय भारताने घेतला होता. त्यासाठी अक्षर पटेलला वगळण्यात आले. मात्र, हा निर्णय चांगलाच महागात आणि नंतर टीकेचा ठरला.
आता झिम्बाब्वेविरुद्ध अक्षरला संधी मिळणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्याने नेटमध्ये जोरदार सराव देखील केला. मात्र, वडिलांच्या आजारपणामुळे रिंकू सिंहला मायदेशी परतावे लागल्यामुळे संघातील एक जागा मोकळी आहे. अक्षर पटेलला तर संधी मिळेलच, पण वॉशिंग्टनचेही स्थान कायम राहू शकते अशी सध्याची स्थिती आहे.

