नवी दिल्ली : कारकीर्दीत एकवेळ निवृत्तीचा विचार आला होता. पण, आता मी त्यापासून दूर आहे. माझ्या निवृत्तीला अजून काही वेळ आहे. जेव्हा वेळ आली असे वाटेल, तेव्हा निश्चितपणे कारकीर्द लांबविणार नाही, असे भारताचा यष्टिरक्षक केएल राहुल याने सांगितले. एका वाहिनीवर केविन पीटरसनला मुलाखत देताना राहुलने क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य असल्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण जाणार नाही, असे सांगितले.
‘‘तुम्ही जेव्हा स्वत:शी प्रामाणिक असता, तेव्हा योग्य वेळ आलेली तुम्हाला समजते आणि अशा वेळी ती वेळ लांबविणे योग्य नाही. मला अजून काही काळ खेळायचे आहे,’’असे राहुल म्हणाला. राहुलने ६७ कसोटी सामन्यांत ४,५०३, तर, ९४ एकदिवसीय सामन्यांत ३,३६० आणि ७२ ट्वेन्टी-२० सामन्यांत २,२६५ धावा केल्या आहेत.
‘‘मी स्वत:ला मोठा मानत नाही. क्रिकेट खेळ असाच सुरू राहणार आहे. पण, आयुष्यात यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमचे कुटुंब महत्त्वाचे आहे. जेव्हा आमच्या संसारात बाळाचे आगमन झाले, तेव्हापासून आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला,’’ असेही राहुलने सांगितले. खेळताना दुखापती या होतच असतात. कारकीर्दीचा तो एक भाग असतो. ती मानसिक लढाई असते. जेव्हा ती लढाई तुम्ही हरता तेव्हा तुम्हाला नव्याने उभे राहणे कठीण जाते. यातून बाहेर पडण्याचे उत्तर तुमचे तुम्हाला शोधायचे असते, असेही राहुल म्हणाला. राहुल गुरुवारपासून सुरू होणार्या रणजी लढतीत कर्नाटककडून खेळणार आहे. ही लढत पंजाबविरुद्ध मोहाली येथे होईल. कर्नाटकसाठी या सामन्यात निर्णायक विजय आवश्यक आहे.
