नवी दिल्ली : अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पुनरुज्जीवन मिळण्याची शक्यता असून न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे. पुढील महिन्यात सुरू होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता जसप्रीत बुमराला एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे ३५ वर्षीय शमीसाठी राष्ट्रीय संघाची दारे पुन्हा खुली होऊ शकतील.

शमीला गेल्या काही काळापासून विविध दुखापतींनी सतावले आहे. त्याने गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. तंदुरुस्तीवर मेहनत घेत शमीने देशांगर्तत क्रिकेटमध्ये बंगालकडून रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय अशा सर्व स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे. यात त्याने सातत्याने दीर्घकाळ गोलंदाजी करून आणि जवळपास प्रत्येकच सामन्यात बळी मिळवत आपली तंदुरुस्ती व लय पुन्हा सिद्ध केली आहे. त्यामुळे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती शमीचा एकदिवसीय संघासाठी विचार करत असल्याचे समजते.

शमी आणि निवड समितीमध्ये विसंवाद असल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. भारतीय संघाने जून-जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. कसोटी मालिकेआधी भारत ‘अ’ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सामने खेळला. यापैकी एका सामन्यात खेळण्याबाबत शमीला विचारणा करण्यात आली होती. मात्र, आपण अद्याप कसोटी सामना खेळण्यास तयार नसल्याचे त्याने निवड समितीतील सदस्याला कळविले होते. यामुळे शमीने निवड समितीची नाराजी ओढवून घेतली.

त्यानंतर भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेसाठी संघ जाहीर करताना आगरकर यांना शमीबाबत विचारण्यात आले होते. त्या वेळी शमीच्या तंदुरुस्तीबाबत स्पष्ट माहिती आपल्याला नाही असे आगरकर म्हणाले होते. शमीने याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करताना निवड समितीने आपल्याशी संवादच साधलेला नाही, असे म्हटले होते. त्यामुळे शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्दच धोक्यात आल्याची चर्चा होती.

शमीने अधिकाधिक सामने खेळणे आणि गोलंदाजी करणे गरजेचे असल्याचे आगरकर यांनी वारंवार नमूद केले आहे. शमीने रणजी करंडकात १४५ षटके, मुश्ताक अली स्पर्धेत जवळपास २७ षटके आणि विजय हजारे स्पर्धेत आतापर्यंत ३४ षटके टाकली. यात त्याने सातत्याने बळीही मिळवले. त्यामुळेच आता निवड समितीला त्याची दखल घेणे भाग पडले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत शमीने बंगालकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंतच्या चार सामन्यांत मिळून आठ गडी बाद केले आहेत.

बंगालचे सामने राजकोट येथे खेळवले जात आहेत. येथील खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल मानल्या जातात. मात्र, शमीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना चमक दाखवली आहे. मुकेश कुमार आणि आकाश दीप हे अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले गोलंदाज बंगाल संघात असल्याचाही शमीला फायदा झाला आहे. त्याआधी मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेतही शमीने दर्जेदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील अखेरच्या तीन सामन्यांत मिळून त्याने ११ बळी मिळवले होते. उष्ण आणि दमट वातावरणातही त्याने दीर्घकाळ गोलंदाजी केली. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबतच्या चिंताही आता दूर झाल्या आहेत.