मुंबई : मुंबई क्रिकेटचा वैभवशाली इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. आम्हाला हरायला अजिबातच आवडायचे नाही. मुंबई क्रिकेटची खरी ओळख म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची वृत्ती. सामना संपेपर्यंत विजय किंवा पराभव निश्चित मानू नका, ही शिकवण मुंबई क्रिकेटने प्रत्येक खेळाडूला दिली. हीच मुंबई क्रिकेटची खासियत आहे, असे माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवरील ‘रवी शास्त्री स्टँड’चे गुरुवारी अनावरण करण्यात आले. त्यावेळी शास्त्री बोलत होते.

माजी क्रिकेटपटू डायना एडल्जी, एकनाथ सोलकर आणि दिलीप सरदेसाई यांचे नाव वानखेडेच्या विविध प्रवेशद्वारांना देण्यात आले. त्यांचेही अनावरण करण्यासाठी गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने वानखेडेवरच खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि सध्याचा ट्वेन्टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, ‘एमसीए’चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

स्टँडला नाव देण्यात आल्याविषयी भावना व्यक्त करताना शास्त्री भावूक झाले. ‘‘माझी पत्नी आणि मुलगी येथे आहे. माझ्या मुलीने मला कधीच खेळताना पाहिले नाही. माझ्या बहिणीसह अन्य कुटुंबीयही येथे उपस्थित आहेत. मला केवळ एकाच गोष्टीचे दु:ख आहे. माझे वडील, माझे हिरो आज आपल्यात नाहीत. त्या काळी ते सर्व सामने गरवारे पॅव्हेलियनमधून पाहत. आता याच स्टेडियमवर माझ्या नावे स्टँड असल्याचा त्यांना नक्कीच अभिमान असेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

‘‘१५ वर्षांच्या माझ्या कारकीर्दीत मी वानखेडेवर अनेक षटकार लगावले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक षटकार माझ्यासाठी सर्वांत खास आहे. मी ब्रूस रीडच्या चेंडूवर आता माझ्या नावाचा स्टँड असलेल्या जागेवरच षटकार लगावला होता,’’ असे शास्त्री यांनी सांगितले. यावेळी एकनाथ सोलकर व दिलीप सरदेसाई यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

मुंबईत मोठे स्टेडियम लवकरच – फडणवीस

मुंबईत लवकरच मोठे स्टेडियम असेल आणि ‘एमसीए’ने त्यासाठी जमीन शोधली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘‘नवीन स्टेडियमची क्षमता अधिक असेल आणि ते अशा ठिकाणी असेल, जेथे स्टेडियम २० मिनिटांत मोकळे केले जाऊ शकते. तसेच, कुठल्याही स्टँडमधून सामना चांगल्या पद्धतीने पाहता येईल. नवीन स्टेडियम कितीही मोठे असले, तरीही त्याची वानखेडे स्टेडियमची तुलना होऊ शकत नाही,’’ असे कार्यक्रमादरम्यान फडणवीस म्हणाले.