नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंची संख्या अमर्याद आहे. मजबूत पायाभूत सुविधा, प्रतिभा हेरण्याची क्षमता आणि उत्कृष्ट ट्वेन्टी-२० लीगमुळे हे शक्य झाले आहे. याच कारणास्तव जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व निर्माण झाले असून आपण एकाच वेळी दोन ते तीन दर्जेदार ट्वेन्टी-२० संघ मैदानावर उतरवू शकतो, असे मत ट्वेन्टी-२० विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.
भारतीय संघाने २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर लगेचच रोहितने क्रिकेटच्या लघुत्तम प्रारूपातून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही या प्रारूपाला अलविदा केले. मग ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमारकडे सोपविण्यात आली. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करताना ५२ पैकी ४२ सामने जिंकले. अलीकडेच भारताने सलग दुसर्यांदा आणि एकूण तिसर्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास घडवला.
‘‘भारतीय क्रिकेटमध्ये अमर्याद प्रतिभा आहे. तुम्हाला देशाच्या कानाकोपर्यातून प्रतिभावान खेळाडू सापडतात. तसेच ‘आयपीएल’, अन्य फ्रँचायझी स्पर्धा आणि देशांतर्गत क्रिकेटमुळे या प्रतिभेला पैलू पडतात. दरवर्षी नवे खेळाडू नावारूपाला येतात. त्यामुळे केवळ ट्वेन्टी-२० क्रिकेटबाबत बोलायचे झाले, तर आपण एकाच वेळी दोन ते तीन दर्जेदार संघ खेळवू शकतो इतके खेळाडू आपल्याकडे आहेत. आपला मुळात पायाच आता भक्कम आहे,’’ असे सूर्यकुमारने वृत्तसंस्थेला सांगितले.
कसोटी खेळायला आवडेल
कसोटी सामने खेळायला मला अजूनही आवडेल. कसोटी क्रिकेटवर माझे विशेष प्रेम आहे, असे वक्तव्य सूर्यकुमारने केले. सूर्यकुमारला २०२३ मध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र, हा त्याचा पहिला आणि शेवटचा कसोटी सामना ठरला. ‘‘मी सुरुवातीला १०-१२ वर्षे रणजी क्रिकेट खेळलो.
मात्र, हळूहळू मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे वळलो. ट्वेन्टी-२० क्रिकेटशी जुळवून घेणे मला सोपे गेले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसे यश मिळाले नाही. आता ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये माझे उत्तम सुरू आहे. परंतु अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याबाबत विचारणा झाली, तर माझी अजिबातच ना नसेल,’’ असे ३५ वर्षीय सूर्यकुमारने सांगितले.
