चेन्नई : पुढील (२०२७) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे तारांकित खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याबाबत साशंकता निर्माण होऊ शकते, असे मत भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.

‘‘२०२७ विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य काय असेल, याबाबत मला चिंता वाटते. मी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा पाहत आहे. मात्र, सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा आणि हजारे करंडकात बरीच तफावत जाणवते. तसेच चाहत्यांना काय हवे, याचा विचार करणे गरजेचे आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व अजूनही कायम आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटसाठी आता जागा उरलेली नाही,’’ असे अश्विन आपल्या ‘यूट्युब’ वाहिनीवर म्हणाला. विराट व रोहितच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय सामने पाहणाऱ्यांची संख्या अधिकच कमी होऊ शकते असे अश्विनला वाटते. विराट व रोहित दोघांनी मिळून ८६ एकदिवसीय शतके केली आहेत.

‘‘रोहित आणि विराट यांनी विजय हजारे करंडकात सहभाग नोंदवला, तेव्हा सर्वांनी सामने पाहण्यास सुरुवात केली. खेळ हा खेळाडूंपेक्षा कधीही मोठाच असतो. मात्र, काही वेळा या स्पर्धांचा दर्जा आणि त्यांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी नामांकित खेळाडूंची गरज भासते. विजय हजारे करंडक ही देशांगर्तत एकदिवसीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा एरवी फारसे कोणी पाहत नाही. मात्र, विराट व रोहितच्या सहभागामुळे चाहते सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. जेव्हा हे खेळाडू एकदिवसीय क्रिकेट खेळणे बंद करतील, तेव्हा काय होईल?’’ असा प्रश्न अश्विनने उपस्थित केला.

अनेक विश्वचषकांच्या आयोजनाचा फटका

अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) आपल्या कार्यक्रमपत्रिकेबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ‘‘एकदिवसीय प्रारूपाचे महत्त्व कमी झाले आहे. जवळपास प्रत्येकच वर्षी ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा आयोजित केली जाते. आर्थिक फायदा हाच त्यामागचा हेतू असतो. मात्र, हे योग्य नाही. त्यांना ‘फिफा’कडून शिकता येऊ शकते. तेथे वेगवेगळ्या लीग कायम सुरू असतात. मात्र, विश्वचषक स्पर्धा चार वर्षांत एकदाच होते. त्यामुळे विश्वचषकाची प्रतिष्ठा टिकून राहते. क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, अनेक द्विपक्षीय मालिका, यामुळे चाहते हळूहळू सामन्यांकडे पाठ फिरवण्याचा धोका आहे,’’ असे अश्विनने नमूद केले.

केवळ एकच विश्वचषक व्हावा

अश्विनच्या मते, चार वर्षांत केवळ एकच विश्वचषक झाल्यास एकदिवसीय प्रारूपाला वाचवता येऊ शकते. ‘‘विविध ट्वेन्टी-२० लीग सुरू राहतीलच. माझ्या मते, चार वर्षांत एकदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित करायला यावी. तसे झाल्यास चाहते सामने पाहण्यास येतील आणि त्यांचा उत्साह कायम राहील,’’ असे अश्विनने सांगितले.