चेन्नई : ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यासाठी चेपॉकबाहेरील वल्लाजा रस्त्यावरून स्टेडियमच्या दिशेने जाताना सर्वत्र निळ्या जर्सी दिसत होत्या. मात्र, त्यातही काही लाल-पिवळ्या रंगाच्या जर्सींनी लक्ष वेधून घेतले. हे होते झिम्बाब्वेचे चाहते. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच होती, पण उत्साह आणि आपल्या संघाला पाठिंबा देण्याच्या बाबतीत ते कोणाहीपेक्षा कमी नव्हते.

‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर आमचा संघ ‘अव्वल आठ’ फेरीसाठी पात्र ठरेल असे वाटले नव्हते. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागला आणि आम्हाला मुंबई येथे झालेल्या (विंडीजविरुद्ध) गेल्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, आता उर्वरित दोन सामन्यांत आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही,’’ असे झिम्बाब्वेच्या एका चाहत्याने सांगितले.

‘‘झिम्बाब्वे क्रिकेटचे नवे पर्व सुरू झाले आहे. आम्ही कोणत्याही प्रतिस्पध्र्याला घाबरत नाही. साखळीत आम्ही ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला हरवून हे दाखवून दिले आहे,’’ असे अन्य एक चाहता म्हणाला. झिम्बाब्वेच्या या चाहत्यांनी वेगवेगळ्या घोषणा देत, विविध गाणी गात प्रत्यक्ष मैदानातही आपल्या खेळाडूंची ऊर्जा वाढवली.

दुसरीकडे, भारतीय चाहत्यांनीही आपल्या संघाला भरघोस पाठिंबा दिला. ‘चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड’ने भारत-झिम्बाब्वे सामन्याच्या तिकीटधारकांना मोफत प्रवासाची मुभा दिली होती. त्यामुळे चाहत्यांचा प्रवास सुकर झाला. चेन्नईतील चाहत्यांना ‘नॉलेजेबल क्राऊड’ अर्थात क्रिकेटची जाण असणारे प्रेक्षक म्हणून संबोधले जाते. हेच या सामन्यात दिसून आले. झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी सीमारेषेवर सूर मारून चेंडू अडवल्यानंतर चेन्नईकरांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांचेही कौतुक केले. खेळाडूंनीही हात उंचावून चाहत्यांचे आभार मानले. हेच या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

चेन्नईकरांचे ‘सॅमसनप्रेम’

झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत संजू सॅमसन खेळणार अशी चर्चा होती. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने सॅमसनच्या समावेशावर शिक्कामोर्तब केल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच सॅमसन फलंदाजी करताना ‘संजू…संजू’ आणि ‘लेट्स गो सॅमसन’ अशा घोषणा देण्यात आल्या.

‘आयपीएल’च्या आगामी हंगामात सॅमसन चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. ‘आयपीएल’ला अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक असला, तरी चेन्नईकरांचे ‘सॅमसनप्रेम’ झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीतच दिसून आले.