मुंबई : स्टेडियममध्ये आमच्या चाहत्यांची संख्या भलेही मोठी नसेल, पण सर्वाधिक आवाज त्यांचाच असतो. त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी बहुमूल्य ठरत असल्याचे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता. मात्र, झिम्बाब्वे संघाला मिळणारा पाठिंबा आता ‘अव्वल आठ’ फेरीत आणखीच कमी होण्याचा धोका आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेचे चारही साखळी सामने श्रीलंकेत झाले. साखळीत झिम्बाब्वेसमोर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघांचे आव्हान होते. त्यामुळे आपला संघ बाद फेरी गाठेल असे झिम्बाब्वेच्या चाहत्यांना वाटले नव्हते. त्यांनी केवळ श्रीलंकेपुरताच विचार केला होता. परंतु झिम्बाब्वेच्या संघाने अनपेक्षित कामगिरी करताना ‘अव्वल आठ’ फेरीही गाठली. त्यामुळे त्यांचे चाहते अडचणीत सापडले असून त्यांनी विश्वचषकाच्या पुढील टप्प्यातील सामन्यांसाठी प्रवास किंवा राहण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

श्रीलंकेतून भारतात जायचे आणि सामन्यांसाठी भारताच्या विविध शहरांत (मुंबई, चेन्नई, दिल्लीत सामने) प्रवास करायचा तर त्यासाठी मोठा खर्च आहे. मात्र, झिम्बाब्वेचे बहुतांश चाहते आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांनी झिम्बाब्वेतील व्यावसायिकांना मदतीची हाक दिली आहे. ‘‘आम्हाला झिम्बाब्वे संघाला भारतात जाऊन पाठिंबा द्यायचा आहे. त्यासाठी आम्हाला आर्थिक मदत करण्याचे मी झिम्बाब्वेतील स्थानिक व्यावसायिकांना आवाहन करतो. ते फुटबॉल सामन्यांसाठी आम्हाला तशी मदत करतात. आम्हाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात आपल्या संघाचा उत्साह वाढवायचा आहे. आम्हाला मदत करा,’’ असे ‘ब्रास बँड’ नामक चाहत्यांच्या ग्रुपचा प्रमुख पॉल मुंगोफाने झिम्बाब्वेतील एका वृत्तपत्राला सांगितले.