मुंबई : काही वर्षांपूर्वीपर्यंत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या झिम्बाब्वेच्या संघाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अनपेक्षित घोडदौड करताना ‘अव्वल आठ’ फेरी गाठण्याची किमया साधली आहे. साखळीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या तुलनेने बलाढ्य मानल्या जाणार्या संघांना पराभूत करताना त्यांनी क्रिकेटविश्वाचे पुन्हा लक्ष वेधून घेतले आहे. आता त्यांची ही आगेकूच रोखण्याचे आव्हान माजी विजेत्या वेस्ट इंडिजसमोर असेल. हे दोन संघ आज, सोमवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येतील.
झिम्बाब्वे आणि विंडीज या दोनही संघांनी साखळी फेरीत चमकदार कामगिरी करताना आपापल्या गटात अग्रस्थान पटकावले. विंडीजने चारही साखळी सामने जिंकले, ज्यात वानखेडेवरच मिळवलेल्या इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा समावेश होता. झिम्बाब्वेने चारपैकी तीन सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, साखळीत अपराजित राहूनही स्पर्धापूर्व गट-मानांकनामुळे या दोन संघांना आता ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्याच सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळावे लागणार आहे.
विंडीजसाठी कर्णधार शाय होप (१५५ धावा, दोन अर्धशतके), शिमरॉन हेटमायर (१३४ धावा) यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे, तर माजी कर्णधार जेसन होल्डरने (७ बळी) गोलंदाजीची जबाबदारी खुबीने सांभाळली आहे. शर्फेन रुदरफोर्डची अखेरच्या षटकांतील फटकेबाजीही निर्णायक ठरत आहे. रॉस्टन चेस, गुदाकेश मोती आणि अकिल होसेन या फिरकी त्रिकुटानेही वेळोवेळी योगदान दिले आहे.
आता कामगिरीत सातत्य राखण्याचा या खेळाडूंचा मानस असेल. दुसरीकडे, झिम्बाब्वेने साखळीतील उत्कृष्ट कामगिरीने क्रिकेटविश्वात ‘आदर आणि ओळख’ परत मिळवली आहे. मात्र, आता ‘अव्वल आठ’ फेरीत त्यांना विंडीजसह जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील या संघाला कामगिरी अधिक उंचवावी लागेल. त्यांची भिस्त रझासह सलामीवीर ब्रायन बेनेट आणि उंचपुरा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझराबानी यांच्यावर असेल.

