बंगालचा युवा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने अभिषेकच्या अटकेचे आदेश दिले होते. अभिषेकसह आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात यावी असं न्यायालयाने म्हटलं होतं. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका मुलीने या दोघांवर बलात्कारासह अन्य गंभीर आरोप केले होते. खाजगी फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचाही या दोघांवर आरोप आहे.
अभिषेक आणि अन्य आरोपीकडचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने जप्त करावेत. जेणेकरून त्यामधल्या आक्षेपार्ह अन्यत्र कुठेही जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असं न्यायालयाने म्हटलं होतं. न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी हुगळीतील मगरा ठाणे पोलिसांना या दोघांच्या अटकेचे आदेश जारी केले होते. अभिषेक डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बंगाल तर आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. प्रकरणाच्या सुनावणीवेळी आरोपींच्या वतीने कोणीही उपस्थित नव्हतं.
प्रेम आहे सांगून लैंगिक शोषण करण्यात आलं असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. खाजगी फोटो इंटरनेवर प्रसारित करू अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोपही आहे. हे फोटो आरोपींच्या फोनमध्ये अजूनही आहेत. यासंदर्भात मगरा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र फोन जप्त करण्यात आले नव्हते. विद्यार्थिनीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आरोपींचे फोन लवकरात लवकर जप्त करण्यात यावेत अशी विनंती न्यायालयाला केली. केवळ याच मुलीला नव्हे तर अन्य मुलींचेही खाजगी फोटो घेऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप या दोघांवर आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं होतं. अटकेसंदर्भात काय पावलं उचलली याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
कोण आहे अभिषेक पोरेल?
२३वर्षीय अभिषेक पोरेल यष्टीरक्षक फलंदाज आहे. ३२ सामन्यात बंगालचं प्रतिनिधित्व करताना १४०८ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. ११४ झेल त्याच्या नावावर आहेत. वृद्धिमान साहा निवृत्त झाल्यानंतर बंगाल संघाच्या यष्टीरक्षणाची धुरा त्याने सांभाळली आहे. २०२३ हंगामात पोरेलने आयपीएल पदार्पण केलं. २०२४ मध्ये त्याला नियमित खेळवण्यात आलं. १४ सामन्यात त्याने १५९च्या स्ट्राईकरेटने ३२७ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. २०२५ मध्ये १३ सामन्यात १४६च्या स्ट्राईकरेटने त्याने ३०१ धावा केल्या. यंदाच्या हंगामात मात्र अभिषेकला अभावानेच संधी मिळाली.
