Vinod Kambli Hospital video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपासून भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात येताना व्हिलचेअरचा आधार घेऊन आल्यानंतर आज विनोद कांबळी आपल्या बिनधास्त शैलीत हातात बॅट घेऊन बाहेर पडला. क्रिकेट खेळत स्ट्रेट ड्राईव्ह लगावत स्वतःच्या पायावर जात असतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तसेच बरे झाल्यानंतर विनोद कांबळीने तरुणांना संदेशही दिला.

डिस्चार्जवेळी विनोद कांबळी म्हणाला, मी आधीच म्हणालो होतो की, बरा होऊनच मी इथून बाहेर पडणार. शिवाजी पार्कात मी विनोद कांबळी असल्याचे सर्वांना दाखवून देणार. मी क्रिकेट कधीही सोडणार नाही. मी पुन्हा मैदानावर दिसेल. या उपचारादरम्यान मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले. प्रेम दिले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. नवीन वर्षांनिमित्त तरुणांना संदेश देताना विनोद कांबळी म्हणाला की, तरुणांनी आयुष्य उत्साहात जगावे, पण दारू पिऊ नये. आयुष्य आनंदात जगावे.

हे वाचा >> Vinod Kambli Heath: “कल खेल में, हम हो ना हो…”, विनोद कांबळींची रुग्णालयातून भावनिक प्रतिक्रिया, प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून दिला चाहत्यांना संदेश!

हे वाचा >> Vinod Kambli: “माझा मुलगा डावखुरा फलंदाज, तोही माझ्यासारखाच…”, विनोद कांबळी आजारपणात कुटुंबाबाबत काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वीच विनोद कांबळीचा रुग्णालयात नृत्य करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ५२ वर्षीय विनोद कांबळीला २१ डिसेंबर रोजी भिवंडीमधील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात ‘चक दे इंडिया’ या गाण्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्याबरोबर नृत्य करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी १९९३ मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. भारताकडून सर्वात जलद १ हजार कसोटी धावा करणारा फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. अवघ्या १४ डावात त्याने ही कामगिरी केली.

विनोद कांबळीने भारतीय संघासाठी १७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १०८४ धावा केल्या. ज्यात ४ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने टीम इंडियासाठी १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २४७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. २००० च्या दशकात त्यांची कामगिरी खूपच खराब राहिली आणि त्यामुळे त्यांना टीम इंडियातून वगळण्यात आले होते.

Story img Loader