“मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना

Vinod Kambli Financial Crisis: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे ३० हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे.

“मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

मुंबईच्या मातीतून आतापर्यंत देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू मिळाले आहेत. अशा क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीचा समावेश होतो. मात्र, सचिनला ज्याप्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी विनोदला मिळाली नाही. कधीकाळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारा विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असले तरी त्याला सचिनसारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी मित्राकडून मदतीची अपेक्षा नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे ३० हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. “मी एक निवृत्त क्रिकेटपटू आहे. मी सध्या पूर्णपणे बीसीसीआयच्या निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यासाठी मी खरोखर मंडळाचा आभारी आणि कृतज्ञ आहे. निवृत्तीवेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत आहे,” असे कांबळीने ‘मिड-डे’ला एका मुलाखतीत सांगितले आहे.

हेही वाचा – AIFF Suspension Case: १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे भवितव्य अधांतरीच; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली

आपण सचिन तेंडुलकरकडून मदत का नाही घेत, याबाबद्दलही कांबळीने सांगितले आहे. कांबळी म्हणाला, “सचिनला सर्व काही माहित आहे. पण, मला त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीमध्ये काम दिले होते. मला तेव्हा खूप आनंद झाला होता. तो खूप चांगला मित्र आहे. तो नेहमीच माझ्यासाठी उपलब्ध असतो. शाळेत असल्यापासून त्याने माझी मदत केली.”

काम करण्यासाठी कांबळी तयार

“मला कामाची गरज आहे. मी तरुणांसोबत काम करायला तयार आहे. मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. पण, गरज भासली तर मला संधी द्यावी. मला मुंबईच्या संघासोबत काम मिळावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मागे माझे कुटुंब आहे, त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला काहीतरी काम द्यावे”, असे विनोद कांबळी म्हणाला आहे.

कांबळीने यापूर्वी प्रशिक्षकाचे काम केलेले आहे. २०१९ मध्ये, त्याने मुंबई टी २० लीगमध्ये एका संघाला प्रशिक्षण दिले होते. याशिवाय, तो तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीचा भाग होता. तिथे त्याने नवख्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricketer vinod kambli opens up about financial crisis and sachin tendulkar help vkk

Next Story
AIFF Suspension Case: १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे भवितव्य अधांतरीच; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी