Lionel Messi father Jorge Messi dies Cristiano Ronaldo condolence message: फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी वडिलांच्या निधनानंतर धक्क्यातून सावरत आहे. यादरम्यान त्याने इन्स्टाग्रामवर वडिलांसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेदरम्यान वडिलांच्या आजारपणाचं ओझं मनावर घेऊनच तो मैदानात उतरला होता, असा उल्लेखही त्याने केला आहे. मागील स्पर्धेनंतर वडिलांनीच त्याला २०२६ च्या विश्वचषकात खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. लिओनेल मेस्सीच्या वडिलांसाठीच्या भावुक पोस्टनंतर आता ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याला भावनिक संदेश पाठवला आहे.
लिओनेल मेस्सीने आपल्या दिवंगत वडील जॉर्ज मेस्सी यांच्यासाठी भावनिक पत्र लिहिल्यानंतर, मेस्सीचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेही त्याला आधार देत मेसेज केला. मेस्सीने इन्स्टाग्रामवर वडिलांबद्दल केलेल्या भावनिक पोस्टवर प्रतिक्रिया देताना रोनाल्डोने लिहिलं, “या कठीण काळात तुला आणि तुझ्या प्रियजनांना खूप प्रेम, लिओ. खंबीर राहा.”
जॉर्ज मेस्सी यांच्या निधनाची बातमी सर्वप्रथम अर्जेंटिनातील माध्यमांनी दिली. त्यानंतर मेस्सीचा बालपणीचा क्लब न्युएल्स ओल्ड बॉईज तसेच रोसारियो शहरातील क्लब अॅटलेटिको रोसारियो सेंट्रल या फुटबॉल क्लबकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली. रोसारियो हेच लिओनेल मेस्सीचं जन्मस्थान आहे.
जॉर्ज मेस्सी यांनी मुलाच्या यशस्वी कारकिर्दीमागे पडद्यामागून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. रोसारियोतील स्थानिक क्लबमध्ये त्यांनी लहानपणी मेस्सीला प्रशिक्षण दिलं होतं. तसेच बालपणी मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी (वाढीच्या हार्मोनची कमतरता) असल्याचं निदान झाल्यानंतरच्या कठीण काळातही ते त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. जॉर्ज मेस्सी नंतर १३ वर्षांच्या लिओनेलला घेऊन बार्सिलोनाला गेले, जिथे त्याची क्लबच्या प्रसिद्ध युवा अकादमीत निवड झाली. बार्सिलोनाने त्याच्या उपचारांचा खर्च उचलला आणि अवघ्या तीन वर्षांत मेस्सीने कॅटलन दिग्गज संघासाठी वरिष्ठ स्तरावर पदार्पण केलं.
यानंतर जॉर्ज मेस्सी आपल्या मुलाचे प्रतिनिधी बनले. लिओनेलने झपाट्याने जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये स्थान निर्माण केलं आणि पुढे सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याची गणना होऊ लागली.
दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोने मंगळवारी त्याची जोडीदार, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर जॉर्जिना रॉड्रिग्झसोबत पोर्तुगालमध्ये विवाह केला. ४१ वर्षीय रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर दोघांनी हातात अंगठ्या घातल्याचा फोटो शेअर केला. वृत्तांनुसार, या जोडप्याने ११ ऑगस्ट रोजी लिस्बनजवळील किनारी शहर कॅस्काइस येथे विवाह केला. रोनाल्डो आणि अर्जेंटिनात जन्मलेल्या जॉर्जिना रॉड्रिगेझ गेल्या जवळपास दशकभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. स्पॅनिश फुटबॉल दिग्गज रिअल माद्रिदकडून खेळत असताना रोनाल्डोची जॉर्जिनाशी पहिली भेट झाली होती. त्या वेळी जॉर्जिना माद्रिदमधील गुच्चीच्या दुकानात काम करत होती.
