Cristiano Ronaldo Record: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील राऊंड ऑफ ३२ फेरीतील सामन्यात पोर्तुगाल आणि क्रोएशिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना पोर्तुगालने २-१ ने आपल्या नावावर केला. यापैकी एक गोल हा रोनाल्डोने केला होता. दरम्यान या सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीतील सामने खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. रोनाल्डोने हा रेकॉर्ड राऊंड ऑफ ३२ फेरीत क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर केला आहे. त्याचं वय ४१ वर्ष आणि १४७ दिवस इतकं आहे. याआधी हा रेकॉर्ड कॅमरुनच्या रॉजर मिलाच्या नावावर होता. आता रोनाल्डोचा हा वर्ल्ड रेकॉर्ड कोणता खेळाडू मोडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यात पोर्तुगालला विजय मिळवून देण्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोलाचं योगदान दिलं. त्याने या सामन्यात १ गोल केला. यासह फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात बाद फेरीतील सामन्यांमध्ये गोल करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. मुख्य बाब म्हणजे, हा रोनाल्डोच्या फुटबॉल कारकिर्दीतील वर्ल्डकप बाद फेरीत केलेला पहिलाच गोल केला. याआधी त्याला बाद फेरीत एकही गोल करता आला नव्हता. या सामन्यात पोर्तुगालचा संघ ०-१ ने पिछाडीवर होता. त्यावेळी पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. त्यावेळी रोनाल्डोने क्रोएशियाच्या गोलकिपरला चकवा देत गोल केला आणि स्कोअर १-१ ने बरोबरीत आणला.

क्रोएशियाकडून ५३ व्या मिनिटाला इवान पेरिसिचने गोल करुन, क्रोएशियाला १-० ने आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सामन्यातील ६८ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टी किकला गोल केला आणि स्कोअर १-१ ने बरोबरीत आणला. हा त्याचा फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीतील पहिलाच गोल ठरला. हा सामना एक्स्ट्रा टाईमला जाणार असं वाटत होतं. सामना समाप्त होण्याआधी क्रोएशियाकडून गोल करण्यात आला, त्यावेळी क्रोएशियाला वाटलं की, स्कोअर २-२ ने बरोबरीत आला आहे. पण पंचांनी पडताळणी करुन पाहिलं, त्यावेळी पंचांनी ऑफ साईडचा इशारा केला आणि हा गोल अमान्य घोषित करण्यात आला. त्यामुळे पोर्तुगालने हा सामना २-१ ने आपल्या नावावर केला.