Cristiano Ronaldo Diet Plan: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या सर्वात तरूण खेळाडूंपैकी आहे. ४१ वय असतानाही रोनाल्डो आजही फुटबॉलच्या सर्वोच्च स्तरावर खेळत आहे. २०२२ पासून तो सौदी प्रो लीगमधील अल-नासर क्लबकडून खेळत असून पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाचं नेतृत्वही करत आहे. सध्या २०२६ च्या फिफा विश्वचषकात तो पोर्तुगालचा कर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळत आहे. कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर रोनाल्डोने आपल्या फिटनेस, शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोनाल्डोचा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी डाएट कसा असतो हे जाणून घेऊया.

मैदानावरील सातत्यपूर्ण कामगिरी आणि स्वतःला कायम सर्वोत्तम ठेवण्याच्या जिद्दीमुळे रोनाल्डो जागतिक फुटबॉलमधील सर्वात प्रेरणादायी आणि आयकॉनिक खेळाडूंपैकी एक मानला जातो. पोर्तुगालमधील मादेरा बेटावरील फुंचाल येथे जन्मलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्यामागे अनेक वर्षांची कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध जीवनशैली आहे. त्याच्या यशात दैनंदिन सवयींचाही मोठा वाटा आहे.

रोनाल्डो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नियमितपणे व्यायामाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अनेकदा त्याचा मोठा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रोड्रिग्जही त्याच्यासोबत वर्कआउट करताना दिसतात. मात्र, रोनाल्डोची खरी ओळख त्याच्या अत्यंत शिस्तबद्ध आहारामुळे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि फिटनेसबाबतची काटेकोर शिस्त यामुळेच तो चाळिशीनंतरही जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आपलं स्थान कायम राखून आहे.

रोनाल्डो नाश्त्याला काय खातो?

रोनाल्डोच्या दैनंदिन दिनचर्येत आहाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. स्नायूंची ताकद आणि शरीरयष्टी कायम राखणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट असल्याने दिवसाची सुरुवात तो पौष्टिक नाश्त्याने करतो. त्याच्या नाश्त्यात ॲव्होकॅडो हा मुख्य घटक असतो. आरोग्यदायी फॅट्स, दीर्घकाळ ऊर्जा देण्याची क्षमता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्मांमुळे तो दररोज ॲव्होकॅडो खातो. याशिवाय कॉफी आणि अंडी हेही त्याच्या नाश्त्याचा अविभाज्य भाग आहेत. अँटिऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषकद्रव्यांनी समृद्ध असलेली कॉफी त्याला प्रशिक्षणासाठी आवश्यक ऊर्जा देते, तर उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेली अंडी स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात.

रोनाल्डोचा दिवसभराचा आहार कसा असतो?

युव्हेंटसमध्ये खेळत असताना रोनाल्डोचा वैयक्तिक शेफ असलेल्या जॉर्जिओ बारोने यांच्या मते, रोनाल्डो रिफाइंड साखर, दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि प्रक्रिया केलेले (Processed) अन्न शक्यतो पूर्णपणे टाळतो. त्याऐवजी तो दिवसातून पाच ते सहा वेळा कमी प्रक्रियायुक्त, ताजे आणि प्रथिनयुक्त अन्न खातो. त्याच्यासाठी योग्य आहाराइतकीच पुरेशी विश्रांती, शरीरातील पाण्याचं संतुलन (Hydration) आणि नियमित व्यायाम यांनाही समान महत्त्व आहे. फिटनेसबाबतची ही कठोर शिस्तच रोनाल्डोला या वयात सर्वोच्च स्तरावर खेळण्यास मदत करत आहे.

दुपारच्या व रात्रीच्या जेवणात रोनाल्डो कोणते पदार्थ खातो?

दुपारचं आणि रात्रीचं जेवणही रोनाल्डो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घेतो. त्याच्या आहारात मासे, चिकन, गोमांस, अंडी, ॲव्होकॅडो, भात आणि नारळाचं तेल यांचा नियमित समावेश असतो. दुपारच्या जेवणात तो विविध भाज्यांसोबत चिकन, गोमांस किंवा मासे खातो. या आहारातून त्याला भरपूर प्रथिने, तंतुमय पदार्थ (फायबर), खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात, जी सर्वोच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवतात. रात्रीच्या जेवणातही तो याच प्रकारचा संतुलित आहार घेतो, मात्र वैविध्य राखण्यासाठी प्रथिनांचा स्रोत बदलतो.

रोनाल्डोचा आवडता पदार्थ कोणता?

रोनाल्डोचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे ‘बकाल्हाऊ आ ब्राश’ (Bacalhau à Brás). पोर्तुगालच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील हा लोकप्रिय पदार्थ मीठात मुरवलेला कॉड मासा, अंडी आणि बारीक कापलेल्या बटाट्याच्या फ्राईज यांच्या मिश्रणातून तयार केला जातो. पोर्तुगालमध्ये कॉड माशापासून बनवल्या जाणाऱ्या हजारहून अधिक पारंपरिक पाककृतींपैकी हा पदार्थ सर्वाधिक प्रसिद्ध मानला जातो.