Cristiano Ronaldo On Lionel Messi Question: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गजांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे. एक दिवसाआधी लिओनेल मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. अर्जेंटिना आणि ऑस्ट्रिया यांच्यात झालेल्या सामन्यात एकच गोल करुन मेस्सी हा फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला होता. आता पोर्तुगाल आणि उजबेकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात रोनाल्डोने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रोनाल्डो हा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. रोनाल्डोने वयाच्या ४१ व्या वर्षी हा कारनामा केला आहे. दरम्यान सामन्यानंतर जेव्हा त्याला मेस्सीबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या सामन्यात पोर्तुगाल आणि उजेबेकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालने ५-०ने विजय मिळवला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी रोनाल्डोला मेस्सीबाबत प्रश्न विचारले, पण रोनाल्डो मेस्सीबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मूडमध्ये नव्हता.

मेस्सीबाबत प्रश्न विचारल्यानंतर, रोनाल्डोच्या चेहऱ्यावर ना कोणती चिडचिड दिसली, ना त्याने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. रोनाल्डोने दुर्लक्ष केलं आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित केलं. पण हा व्हिडीओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये वाद पेटला आहे. या सामन्यात रोनाल्डोने २ गोल केले. त्यावेळी मिक्स्ड झोनमधून जात असताना एका पत्रकाराने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील मेस्सीच्या गोल करण्याच्या रेकॉर्डचा विषय काढण्याचा प्रयत्न केला. रोनाल्डोची रिअॅक्शन पाहून चाहते हेच म्हणत आहेत की, रोनाल्डोने मुद्दाम दुर्लक्ष केलं.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मेस्सी आणि रोनाल्डो हे दोघेही तुफान चर्चेत राहिले आहेत. अर्जेंटिनाकडून खेळताना मेस्सीने आतापर्यंत २ सामन्यांमध्ये ५ गोल केले आहेत. तर रोनाल्डोने उजबेकिस्तानविरुद्ध खेळताना २ गोल करुन मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. याआधी रोनाल्डोच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, पण अखेर त्याने दमदार पुनरागमन करुन प्रत्युत्तर दिलं आहे. याआधी पोर्तुगालचा सामना डीआर काँगोविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात रोनाल्डोला एकही गोल करता आला नव्हता. या सामन्यात तो केवळ २५ वेळा चेंडूला स्पर्श करु शकला होता. पण आता उजबेकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन केलं आहे.

पोर्तुगालचा संघ आपल्या गटात मजबूत स्थितीत आहे. रोनाल्डो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे. हा रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्डकप अशू शकतो. तसेच मेस्सीचा देखील शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. जवळपास २ दशकांपासून या दोघांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली आहे. दोघांनी मिळून १३ बॅलोन डी ओर पुरस्कार पटकावले आहेत. दोघांनी मिळून असंख्य रेकॉर्ड मोडले आहेत.