‘फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची कार्यपद्धती विलक्षण अशी आहे. त्यामुळेच तो अत्यंत प्रेरणादायी आहे’, अशा शब्दांत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘गेली अनेक वर्ष तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने दमदार प्रदर्शन करत आहे. यामागचे कारण म्हणजे अथक मेहनत. प्रचंड कष्ट करून तंत्रकौशल्ये घोटीव करणारा फुटबॉलपटू अशी त्याची ओळख आहे. त्यामुळेच त्याने अढळस्थान पटकावले आहे. लिओनेल मेस्सी महान खेळाडू आहे. मात्र प्रचंड मेहनतीच्या बळावर सातत्याने खेळात सुधारणा करत रोनाल्डो मेस्सीला टक्कर देतो’, असे कोहलीने सांगितले.

‘सदैव चांगली कामगिरी करण्याचे दडपण प्रत्येक क्रीडापटूवर असते. मात्र तो त्याकडे कसा पाहतो यावर त्याची वाटचाल अवलंबून आहे. दडपणाचा आनंद घेण्यास मी सुरुवात केली आहे. दडपणाच्या परिस्थितीपासून पळून उत्तर सापडत नाही. कोणत्याही परिस्थितीतून पुनरागमन करता यायला हवे. खेळात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. सातत्य राखणे अत्यंत अवघड आहे. उणीवांचे रुपांतर बलस्थानांमध्ये करता येण्याची खुबी आत्मसात करणे अवघड कौशल्य आहे. माझा खेळ मी अधिक चांगल्या रीतीने समजू लागलो आहे. प्रत्येक खेळाडूत काही उणिवा, त्रुटी असतात. त्यावर मात करून वाटचाल करणे महत्वाचे असते’, असे कोहलीने सांगितले. २०१६ वर्षांत सर्व प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.