Cristiano Ronaldo leaves Portugal national camp controversy: दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाचा कॅम्प सोडला आहे. रोनाल्डो पोर्तुगालच्या कोपनहेगनमधील प्रशिक्षण शिबिरातून अचानक बाहेर पडला. नेशन्स लीगपूर्वी रोनाल्डोने घेतलेल्या या निर्णयामुळे पोर्तुगालच्या फुटबॉलमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोर्तुगीज फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष पेद्रो प्रोएन्सा यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण राष्ट्रीय संघाचा कॅम्प सोडण्याचा निर्णय घेतल्याचं रोनाल्डोने सोशल मीडियावर जाहीर केलं. योग्य वेळ आल्यावर या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य आणि कॅम्प सोडण्यामागचं कारण आपण स्वतः सांगू, असंही त्याने म्हटलं आहे.

मात्र, रोनाल्डोच्या या निर्णयानंतर युरोपियन माध्यमांमध्ये या प्रकरणाबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. पोर्तुगालचा प्रशिक्षक जॉर्ज जीझस, रोनाल्डो आणि फुटबॉल महासंघाचे प्रमुख यांच्यात नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे रोनाल्डोचं राष्ट्रीय संघातील स्थान आणि प्रशिक्षकांसोबतचं त्याचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

रोनाल्डोने सोशल मीडियावर लिहिलं, “राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाची पत्रकार परिषद आणि त्यानंतर पोर्तुगीज फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर मी राष्ट्रीय संघाचा कॅम्प सोडण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी माझ्या या निर्णयामागची कारणं आणि संपूर्ण सत्य मी पोर्तुगालच्या जनतेसमोर सांगेन. या राष्ट्रीय संघासाठी मी नेहमीच पूर्णपणे समर्पित राहिलो आहे. सध्या पोर्तुगाल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना, कोणताही अपवाद न करता, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याची हीच वेळ आहे.”

पोर्तुगालच्या कॅम्पमध्ये नेमकं काय घडलं?

पोर्तुगीज माध्यमांच्या वृत्तानुसार, नॉर्वेविरुद्धच्या UEFA नेशन्स लीग सामन्यादरम्यान या वादाची सुरुवात झाली. याआधी काही दिवसांपूर्वी वेल्सविरुद्धच्या सामन्यात खेळलेला रोनाल्डो नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या संघात नव्हता. दुसऱ्या हाफमध्ये त्याने वॉर्मअपही केला, मात्र सामन्याची परिस्थिती पाहता प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांनी आपला डावपेच बदलला आणि अखेर रोनाल्डोला मैदानावर उतरवलंच नाही.

रोनाल्डो संपूर्ण ९० मिनिटं बेंचवरच राहिला. त्याच्या जागी गोंसालो रामोसने आघाडीवर शानदार कामगिरी करत निर्णायक गोल केला आणि पोर्तुगालने नॉर्वेचा २-१ असा पराभव केला. मात्र, सामन्याच्या अखेरीस रोनाल्डोने सहकाऱ्यांसह प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी मैदानावर न थांबता थेट ड्रेसिंग रूमचा मार्ग धरला. त्याला मिळालेल्या कमी खेळाच्या वेळेबद्दल तो नाराज असल्याचं त्याच्या या कृतीवरून दिसून आलं.

माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आल्यानंतर आणि पोर्तुगालच्या कॅम्पमधील तणाव वाढत असताना, पोर्तुगीज फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष पेद्रो प्रोएन्सा यांनी स्कँडिनेव्हियाला धाव घेतली. रोनाल्डो आणि प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांच्याशी त्यांनी तातडीने प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर जॉर्ज जीझस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दोघांमध्ये मोठा वाद असल्याच्या वृत्तांना फारसं महत्त्व दिलं नाही. तसेच संघनिवडीबाबतचा अंतिम अधिकार पूर्णपणे आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मात्र, ‘मार्का’च्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणाचा ज्या पद्धतीने सामना करण्यात आला, त्याबाबत रोनाल्डोची भूमिका वेगळी होती. प्रशिक्षकाच्या या सार्वजनिक भूमिकेमुळे दोघांमधील मतभेद पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर काही वेळातच रोनाल्डोने प्रशिक्षण शिबिर सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, मात्र राष्ट्रीय संघाबरोबरच्या त्याच्या भविष्यातील वाटचालीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

रोनाल्डोच्या बहिणीच्या वक्तव्याने वादाच्या चर्चांना उधाण

रोनाल्डोची बहीण एल्मा अवेइरोनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपल्या भावाला योग्य वागणूक दिली गेली नसल्याचं सूचित केलं. या ताज्या घटनेनंतर तिने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातील काही सहकाऱ्यांनी रोनाल्डोचा योग्य सन्मान केला नसल्याचंही थेट संकेत दिले.

एल्माने इन्स्टाग्रामवर लिहिलं, “CR7 अधिक सन्मानास पात्र होता, राष्ट्रीय संघाला अधिक शिस्तबद्ध रचनेची गरज होती आणि पोर्तुगीज पत्रकारितेलाही अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज होती. पोर्तुगालच्या जनतेबद्दल काय बोलावं… कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम असण्याचा त्यांना अधिकारच नाही.”

ती पुढे म्हणाली, “आम्ही मत्सरी, तुच्छतादर्शक आणि अज्ञानी आहोत. ख्रिस्तियानोच्या आधी फुटबॉलमध्ये जी सामान्य पातळी होती, त्याच पातळीवर परत जाण्याचीच आमची लायकी आहे. CR7, तू केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद! तू यापेक्षा अधिक सन्मानास पात्र होतास.”