Cristiano Ronaldo marries Georgina Rodriguez in secret wedding ceremony: क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिगेझ यांनी अखेर आपल्या बहुचर्चित नात्याला अधिकृत रूप दिल्याची माहिती समोर आली आहे. रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळापासूनची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची बातमी शेअर करून चाहत्यांना एक मोठा सुखद धक्का दिला आहे. स्वत: रोनाल्डोने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
११ ऑगस्टला, ४१ वर्षीय रोनाल्डो आणि ३२ वर्षीय जॉर्जिना यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांच्या हातामध्ये लग्नाच्या अंगठ्या दिसत होत्या. या फोटोसोबत त्यांनी अत्यंत छोटं पण खास असं ‘C love G’ हे कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांच्या तर्क वितर्कांना जणू दुजोरा मिळाला. दोघांच्या बोटांत अंगठ्या दिसल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि या फोटोने त्या चर्चांना अधिक बळ दिलं. मात्र, या जोडप्याने लग्नाच्या समारंभाचे इतर कोणतेही फोटो अद्याप शेअर केलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाह पोर्तुगालमधील लिस्बनजवळील ‘कास्काइश’ (Cascais) या सुंदर किनारी रिसॉर्टवर पार पडला. रोनाल्डोचे PR सांभाळणाऱ्या ‘ब्रन्सविक ग्रुप’ने सांगितलं की, हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी ठेवण्यात आला होता. या लग्नाला रोनाल्डो आणि जॉर्जिना यांची पाचही मुले उपस्थित होती.
लग्नाच्या अफवांनी घेतलं होतं वेगळंच वळण
विशेष म्हणजे, लग्नापूर्वी या जोडप्याबाबत एक मजेशीर गैरसमजही झाला होता. लग्नाच्या काही दिवस आधी रोनाल्डो आणि जॉर्जिना यांचा विवाह मादेरामधील, म्हणजेच रोनाल्डोच्या मूळ गावी असलेल्या फुंचालच्या एस कॅथेड्रलमध्ये होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांमुळे शेकडो चाहते कॅथेड्रलबाहेर जमले होते. त्यांना रोनाल्डो आणि जॉर्जिनाची एक झलक पाहायची होती. मात्र तेथील वधू जॉर्जिना नसल्याचं समोर आलं.
प्रत्यक्षात निकोल नावाची महिला तिच्या जोडीदार फाबियोसोबत विवाहबंधनात अडकण्यासाठी तिथे आली होती. या गोंधळाकडे रोनाल्डोनेही विनोदी नजरेने पाहिलं. या चुकीच्या अफवेबाबतच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर त्याने मोठ्याने हसल्याचे इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली होती. रोनाल्डोच्या कुटुंबीयांनीही त्या आठवड्याच्या शेवटी दोघांचं लग्न होणार असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तर स्वतः रोनाल्डोने समारंभ नेमका कधी होणार, याबाबत पूर्ण मौन बाळगलं होतं.
