Cristiano Ronaldo Portugal return update Jorge Jesus statement: फुटबॉलमधील दिग्गज फुटबॉलपटूंपैकी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या चर्चेचा विषय आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू असलेल्या रोनाल्डोने गेल्या आठवड्यात संघ सोडला होता. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात त्याला सुरुवातीच्या संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यातही तो सुरुवातीपासून खेळणार नसल्याचं त्याला सांगण्यात आलं होतं. यानंतर रोनाल्डोने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि योग्य वेळी याबाबत स्पष्टीकरण देणार असल्याचं म्हटलं होतं. यादरम्यान अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
पोर्तुगालचे प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांनी स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या राष्ट्रीय संघातील पुनरागमनाची शक्यता नाकारलेली नाही. रोनाल्डो आणि प्रशिक्षक यांच्यातील मतभेदांमुळे आणि वादांमुळे संघाची साथ सोडल्याची चर्चा सुरू आहे. रोनाल्डो पोस्ट शेअर करत या संपूर्ण घटनेची कधी माहिती देणार याची चाहते वाट पाहत असताना पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
रोनाल्डोच्या पुनरागमनासाठी पोर्तुगाल संघाचे दरवाजे खुले असल्याचं जिझस यांनी स्पष्ट केलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नॉर्वेविरुद्ध पोर्तुगालच्या २-१ विजयाच्या सामन्यानंतर जिझस म्हणाले, “त्याला परत यायचं असेल तर तो राष्ट्रीय संघात परतू शकतो. पुढील संघनिवडीपूर्वी आम्ही त्याच्याशी चर्चा करू शकतो. मात्र, अंतिम निर्णय क्रिस स्वतः घेईल.”
“राष्ट्रीय संघासोबतचा आपला प्रवास कसा आणि केव्हा संपवायचा, याचा निर्णय त्यानेच घ्यायला हवा. मी पहिल्यांदा संघाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्याला म्हटलं होतं, ‘मला तुझी गरज आहे. तू संघात माझ्यासोब असायला हवा. तू खेळत असशील किंवा नसेल, तरी मला तुझी गरज आहे आणि आताही मी पुन्हा तेच सांगत आहे.”
रोनाल्डोच्या अनुपस्थितीतही पोर्तुगालने डेन्मार्कचा पराभव केला. त्यानंतर नॉर्वेविरुद्ध विजय मिळवत संघाने नेशन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रोनाल्डो हा पोर्तुगालचा सर्वाधिक गोल करणारा आणि सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर २३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल १४६ गोल आहेत.
पोर्तुगालला अजूनही रोनाल्डोची गरज
पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष पेड्रो प्रोएन्सानेही रोनाल्डो संघाच्या भविष्यातील योजनांचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे. रोनाल्डोने संघ सोडणं हा एक गैरसमज होता आणि या प्रकरणावर अंतर्गत पातळीवर चर्चा होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
आरटीपीशी बोलताना प्रोएन्सा म्हणाले, “तो त्याच्या खेळाच्या गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय संघात आहे आणि याबाबत कोणतीही शंका असू नये. आपण ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या योगदानाचा सन्मान केला पाहिजे.”
विशेष म्हणजे, जॉर्ज जिझस यांनी यापूर्वी सौदी अरेबियातील अल-नासर क्लबमध्ये रोनाल्डोला प्रशिक्षण दिलं आहे. रोनाल्डोने इच्छा व्यक्त केल्यास पुढील आंतरराष्ट्रीय ब्रेकमध्ये तो पुन्हा पोर्तुगालच्या संघात दिसू शकतो, अशी अपेक्षा जिझस यांनी व्यक्त केली आहे. पोर्तुगालचा पुढील सामना १४ नोव्हेंबरला डेन्मार्कविरुद्ध होणार असून, त्यानंतर १७ नोव्हेंबरला संघ वेल्सविरुद्ध खेळण्यासाठी रवाना होईल.
