आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेला पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुरुवारी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे ४१ वर्षीय रोनाल्डोने आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लावला. नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेनंतर आपण पोर्तुगालची प्रसिद्ध ‘जर्सी क्रमांक ७’ सोडणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“गोल आणि विक्रम बदलतील, पण…” – रोनाल्डो भावूक

आपल्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये रोनाल्डोने चाहत्यांचे आणि देशाचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. रोनाल्डो म्हणाला, “आज पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघासाठीचा मैदानावरील माझा प्रवास संपत आहे. मी देशासाठी दिलेल्या योगदानाचा अभिमान बाळगून निरोप घेत आहे. मी पोर्तुगालसाठी माझे सर्वस्व पणाला लावले याचे मला पूर्ण समाधान आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “काळाच्या ओघात मी केलेले गोल मागे पडतील, मिळालेले चषक संग्रहालयात जमा होतील आणि विक्रमही मोडले जातील. परंतु, लोकांच्या हृदयात आपण निर्माण केलेले स्थान काळ कधीही पुसू शकत नाही. जगात सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य वेचले, परंतु जगातील सर्वोत्तम देशाचे प्रतिनिधित्व करणे हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे हे मला आज समजले. या २३ वर्षांच्या प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार!”

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वोत्तम आकडेवारी

फुटबॉल इतिहासात पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत:

  • एकूण सामने: २४३
  • एकूण गोल: १४६
  • जागतिक विक्रम: आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक गोल नोंदवण्याचा ऑल-टाइम वर्ल्ड रेकॉर्ड रोनाल्डोच्याच नावावर आहे.

आपल्या क्लब कारकीर्दीत मँचेस्टर युनायटेड आणि रिअल माद्रिदकडून खेळताना त्याने ६ वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच पोर्तुगालला ‘युरो कप’ आणि ‘नेशन्स लीग’चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती.

वादाची किनार आणि राष्ट्रीय संघातील निलंबन

रोनाल्डोची ही निवृत्ती एका घडामोडीनंतर समोर आली आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने रोनाल्डोला संघातून ३० दिवसांसाठी निलंबित केले होते आणि त्याला २८५ डॉलरचा दंड ठोठावला होता.

सप्टेंबर महिन्यात ‘नेशन्स लीग’दरम्यान प्रशिक्षक जीझस यांनी नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोला अंतिम संघात स्थान दिले नव्हते. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत रोनाल्डोने थेट संघाचे प्रशिक्षण शिबिर सोडून काढता पाय घेतला होता. त्यानंतर त्याने प्रशिक्षक जीझस यांच्यावर कराराचे पालन न केल्याचा आरोप करत गंभीर टीका केली होती.

असोसिएटेड प्रेसच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी डेन्मार्कविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी हे निलंबन लागू झाले होते. रोनाल्डोच्या गैरहजेरीतही पोर्तुगालने डेन्मार्क आणि नॉर्वेचा पराभव करत युएफा नेशन्स कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

६ वर्ल्ड कप आणि ऐतिहासिक विक्रम

यापूर्वी जुलैमध्ये रोनाल्डोने २०२६ चा फिफा वर्ल्ड कप हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असेल असे स्पष्ट केले होते. डॅलस येथे स्पेनविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा पराभव झाल्याने रोनाल्डोचे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

मात्र, या वर्ल्ड कपमध्येही रोनाल्डोने एका नव्या इतिहासाला गवसणी घातली. २००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ अशा सलग ६ फिफा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगालसाठी सर्वाधिक ११ गोल करण्याचा विक्रमही त्याच्याच नावे जमा आहे.

रोनाल्डोच्या या निर्णयामुळे जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांमध्ये आणि पोर्तुगालमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एक महान खेळाडू म्हणून मैदानावरील त्याची ऊर्जा आणि ७ क्रमांकाची जर्सी फुटबॉल प्रेमींच्या सदैव स्मरणात राहील.