Cristiano Ronaldo Portugal Team Controversy Clarification: ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाबरोबरच्या नुकत्याच झालेल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडण्याचा निर्णय आणि प्रशिक्षकाबरोबरचे संबंध बिघडण्यामागे नेमकं काय घडलं, याबाबत त्याने सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
ज्या रात्री लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला, त्याच रात्री रोनाल्डोने पोर्तुगालकडून निवृत्ती घेण्याचा निर्णय पुढे ढकलला. प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांच्याबरोबर झालेल्या मतभेदानंतर रोनाल्डोने नुकतंच पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ४१ वर्षीय रोनाल्डो गेल्या आठवड्यात पोर्तुगालच्या नेशन्स लीग शिबिरातून बाहेर पडला. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात त्याला स्थान मिळालं नव्हतं आणि तो संपूर्ण सामना राखीव खेळाडूंच्या यादीत राहिला. त्यानंतर डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यातही तो सुरुवातीच्या संघात खेळणार नसल्याचं त्याला समजलं.
यानंतर रोनाल्डोने सोशल मीडियावर एक पोस्ट करत या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती नंतर देणार असल्याचं म्हटलं होतं. मंगळवारी रात्री अखेर त्याने इन्स्टाग्रामवर तब्बल सहा स्लाइड्समध्ये जवळपास २ हजार शब्दांचं सविस्तर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली. पोर्तुगालच्या कर्णधाराने राष्ट्रीय संघातून अचानक बाहेर पडल्याबद्दल आपल्याला “शिक्षा” मिळायला हवी होती, असं म्हटलं. त्याचवेळी प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांनी आपल्याला “दोन वेळा दिलेला शब्द पाळला नाही”, असा आरोपही रोनाल्डोने केला.
रोनाल्डोने जॉर्ज जिझस यांच्यावर “पूर्णपणे विश्वासघात केल्याचा” आरोप केला. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात आपल्याला खेळवण्याचं आश्वासन दिल्यानंतरही त्यांनी आपल्याला बाकावर बसवलं, असा रोनाल्डोचा दावा आहे. त्यानंतर माध्यमांसमोर दोघांनी एकच भूमिका मांडायची, असा झालेला करारही जिझस यांनी पाळला नाही, असं त्याने म्हटलं. रोनाल्डो म्हणाला, “माझ्या कृतींचे परिणाम पोर्तुगीज फुटबॉल महासंघाने ठरवावेत आणि त्यासाठी मला शिक्षा करावी. माझ्या मते, ही शिक्षा कमी करण्यात येऊ नये.” तो पुढे म्हणाला, “मी आधीच माफी मागितली आहे, पण माझ्या कृतींचे परिणाम होतात, याची मला जाणीव आहे.”
दरम्यान, रविवारी जॉर्ज जिझस यांनी आपल्यात आणि रोनाल्डोमध्ये कोणताही वाद नसल्याचं सांगितलं होतं. सौदी अरेबियातील अल-नसार संघाच्या प्रशिक्षकपदाच्या मागील कार्यकाळात त्यांनी रोनाल्डोबरोबर काम केलं होतं. रोनाल्डो पुन्हा पोर्तुगालच्या संघात परतण्यासाठी तयार असल्याचंही जिझस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, रोनाल्डोनेही राष्ट्रीय संघाकडून खेळत राहण्याची तयारी दर्शवली आहे. आपण “शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून, आपल्या क्लबकडून खेळत आहे आणि आशा आहे की गोलही करत राहीन,” असं त्याने म्हटलं. त्यामुळे पोर्तुगालसाठी खेळण्याचा त्याचा प्रवास अद्याप संपलेला नाही.
“माझ्यावरील निलंबनाची मुदत संपल्यानंतर मी नेहमीप्रमाणेच राष्ट्रीय संघासाठी खेळण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी उपलब्ध असेन,” असंही रोनाल्डोने स्पष्ट केलं. रोनाल्डोने आपल्या निवेदनातील काही भागात मवाळ भूमिका घेतली असली, तरी जॉर्ज जिझस यांच्या निर्णयांवर त्याने टीका कायम ठेवली. खेळाचा वेळ व्यवस्थापित करण्यासाठी आपल्यात एक करार झाला होता. त्यानुसार नॉर्वे आणि डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यांमध्ये विश्रांती दिली जाणार होती, असं जिझस यांनी सांगितलं होतं. मात्र, नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात मला ३० मिनिटं खेळवलं जाणार असल्याचं नंतर सांगण्यात आलं, असा रोनाल्डोचा दावा आहे.
रोनाल्डो म्हणाला, “पुढे काय झालं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मी मध्यंतरापासून वॉर्म-अप करत होतो. एक-एक मिनिट जात होतं, पण मला मैदानात उतरवलंच गेलं नाही. प्रशिक्षकांनी मला दिलेला शब्द पाळला नाही”, असंही रोनाल्डोने म्हटलं.
यानंतर जिझस यांच्याबरोबर झालेल्या आणखी एका चर्चेचा उल्लेख करताना रोनाल्डोने सांगितलं की, पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणावर प्रशिक्षकांनी स्पष्टीकरण द्यावं, असं ठरलं होतं. यासाठी आठ मुद्द्यांवर सहमतीही झाली होती. त्यामध्ये रोनाल्डोने खेळण्यासाठी कधीही दबाव टाकला नाही आणि जिझस यांच्या निर्णयांचा त्याने आदर केला, अशा विधानांचाही समावेश होता. तसेच, “पेले किंवा मॅराडोना यांच्या तोडीच्या खेळाडूला” वॉर्म-अप करायला सांगून त्यानंतर मैदानात न उतरवणं हीदेखील प्रशिक्षकांची चूक होती, असं सांगण्यात आलं होतं.
मात्र, जिझस यांच्या पत्रकार परिषदेत यापैकी एकाही मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला नाही, असा रोनाल्डोचा दावा आहे. त्यामुळे “प्रशिक्षकांनी माझा शब्द न पाळण्याची ही दुसरी वेळ होती,” असं त्याने म्हटलं. याआधी रोनाल्डोने आपल्या माजी अल-नसार प्रशिक्षक जॉर्ज जिझस यांना पोर्तुगालच्या प्रशिक्षकपदासाठी “योग्य व्यक्ती” असल्याचं म्हटलं होतं.
रोनाल्डोने आणखी एक मोठा खुलासा करत सांगितलं की, यंदाच्या विश्वचषकातील पोर्तुगालच्या अंतिम १६ संघांमधून बाहेर पडल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचाही गांभीर्याने विचार केला होता. त्याने चाहत्यांसाठी निरोपाचं पत्रही तयार केलं होतं. मात्र, अमेरिकेतून मायदेशी परतताना विमानप्रवासादरम्यान पोर्तुगीज फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष पेड्रो प्रोएन्सा यांनी त्याला आपला निर्णय बदलण्यास प्रवृत्त केलं. रोनाल्डोने आपल्या कृतीबद्दल माफी मागितली असली, तरी प्रशिक्षण शिबिरातून अचानक बाहेर पडण्याच्या निर्णयावर त्याने आपली भूमिका कायम ठेवली.
“मी प्रशिक्षण शिबिर सोडून गेल्याबद्दल माझ्या राष्ट्रीय संघातील सहकाऱ्यांची माफी मागणं माझं कर्तव्य आहे. पोर्तुगालच्या जनतेचीही मी पुन्हा एकदा माफी मागतो. मात्र, एखाद्याने दिलेला शब्द मोडणं हा माझ्यासाठी खूप मोठा आणि निर्णायक मुद्दा आहे,” असं रोनाल्डोने लिहिलं.
