Gujarat Titans vs Chennai Super Kings: गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या पराभवासह चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्रवास इथेच संपन्न झाला आहे. स्पर्धेतील ६६ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी बाद २२९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाचा डाव १४० धावांवर आटोपला. यासह गुजरात टायटन्सने हा सामना ८९ धावांनी आपल्या नावावर केला.

चेन्नई सुपर किंग्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा होता. इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण तशी सुरुवात मिळू शकली नाही. सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर मॅट शॉर्ट २४ धावांवर बाद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या १६ धावांवर माघारी परतला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना उर्विल पटेलकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो देखील शून्यावर माघारी परतला.

कार्तिक शर्माने हातभार लावून १९ धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने अवघ्या १७ चेंडूत ४७ धावांची खेळी करून सामना खेचून आणायचा प्रयत्न केला. पण त्याला रशीद खानने झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर अंशूल कंबोजने १९ धावांची खेळी केली. पण चेन्नईचा संपूर्ण डाव १४० धावांवर आटोपला. चेन्नईने हा सामना ८९ धावांनी गमावला. हा चेन्नईचा या स्पर्धेतील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव आहे.

गुजरातने उभारला २२९ धावांचा डोंगर

या सामन्यात गुजरातचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातला जशी सुरुवात हवी होती, तशी सुरुवात साई सुदर्शन आणि शुबमन गिल या जोडीने करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. गिलने ६४ धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने ८४ धावा चोपल्या. शेवटी जोस बटलर ५४ धावांवर नाबाद राहिला. गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद २२९ धावा केल्या.