Hardik Pandya CSK Trade: आयपीएल २०२६ हंगाम संपल्यानंतर हार्दिक पंड्या सातत्याने ट्रेडच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला यंदा गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. हार्दिकच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात मुंबईला दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. मात्र, २०२५ च्या हंगामात संघाने तिसरे स्थान पटकावलं होतं. आयपीएळ २०२६ मधील मुंबई इंडियन्स संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हार्दिक पंड्या संघाची स्थान सोडणार असल्याचं म्हटलं जात आगे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सने हार्दिकला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी मोठी उत्सुकता दाखवली असून, यासाठी त्यांनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी अनेक चर्चा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सलाही हार्दिकमध्ये रस असल्याचं सांगितलं जात आहे. यशस्वी जैस्वालच्या बदल्यात हार्दिकचा ट्रेड होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी राजस्थानने रियान परागला भविष्यातील दीर्घकालीन कर्णधार म्हणून पाहत असल्यामुळे हा ट्रेड होण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे.
दरम्यान, बुधवारी हार्दिक पंड्याबाबत आणखी एका मोठ्या ट्रेडची चर्चा रंगली. आयपीएल २०२७ हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी मोठा ट्रेड करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, फ्रँचायझीने अधिकृतपणे या वृत्ताचं खंडन केलं आहे.
“हार्दिकबाबत आमच्याकडून कोणतीही चर्चा झालेली नाही. मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धा संपल्यानंतर हंगामाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील,” असे सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी हिंदुस्तान टाइम्स डिजिटलशी बोलताना स्पष्ट केलं.
चेन्नई सुपर किंग्जची मेजर लीग क्रिकेटमधील टेक्सास सुपर किंग्ज ही फ्रँचायझी असल्याने व्यवस्थापनातील अनेक सदस्य सध्या अमेरिकेत आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सनेही हार्दिकच्या ट्रेडबाबत सावध भूमिका घेतली आहे. “आम्ही नुकताच हंगामानंतरचा आढावा सुरू केला आहे. संघाच्या प्रत्येक बाबीचा सखोल विचार केला जाईल,” असे मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने रेव्हस्पोर्ट्झशी बोलताना सांगितलं.
मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने सांगितलं, “अशा प्रकारच्या हंगामानंतर आढाव्यात विविध पर्याय आणि शक्यतांचा विचार केला जातो. खेळाडूंबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचं सखोल मूल्यमापन केलं जाईल. सध्या आम्ही कोणत्याही खेळाडूच्या ट्रेडसंदर्भात चर्चा करत नाही. हा आढावा पूर्ण झाल्यानंतरच अशा निर्णयांवर विचार होऊ शकतो.”
दरम्यान, आयपीएलमधील आणखी एका निराशाजनक हंगामानंतर हार्दिक पंड्याच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला गेल्या तीन हंगामांत केवळ एकदाच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने १४ सामन्यांत केवळ ८ गुण मिळवत गुणतालिकेत नवव्या स्थानावर हंगामाची सांगता केली.
